नाशिक : आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँकखात्यात भरपाई

अवकाळी नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने ६३ कोटी ९ लाख ७७ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. येत्या आठवडारात हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाऊ शकते.

राज्यावर अवकाळीचा फेरा कायम आहे. गेल्या महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतीपिकांना बसला आहे. तब्बल १ लाख १३ हजार ४०२ हेक्टरवरील पिकांचे मातेरे झाले. त्यामुळे २ लाख २५ हजार १४७ शेतकरी बाधित झाले. नाशिक विभागामधील पाचही जिल्ह्यांमधील ३५ हजार ८७९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ७०,६६६ शेतकऱ्यांना फटका बसला. राज्य सरकारने एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवत शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने १० एप्रिलच्या कॅबिनेटमध्ये मार्च महिन्यातील अवकाळी व गारपिटीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचे अनुदान वितरणास मान्यता दिली. नाशिक विभागासाठी ६३ कोटी ९ लाख ७७ हजारांचे अनुदान मिळणार आहे. त्यामध्ये जळगावमधील बाधित शेतकऱ्यांसाठीच्या सर्वाधिक २० कोटी ४२ लाख ६१ हजार रुपयांचा समावेश आहे. त्याखालोखाल नाशिकसाठी १७ कोटी ३६ लाख ३६ हजार रुपयांना मंजुरी दिली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत येत्या ८ दिवसांत हे अनुदान थेट बाधितांच्या बँकखात्यावर जमा केले जाईल. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

असे मिळणार अनुदान

जिल्हा         शेतकरी           बाधित क्षेत्र (हे.)     अनुदान (लाखांत)

नाशिक        २२,९५६            ९,१७६.८९              १,७३६.३६

धुळे             ८,७१७              ३,९४४.०२             ६७५.९८

नंदुरबार       ८८३६               ४७३०.०४              ८१३.२३

जळगाव       १८,३६४             ११,९९१.०९            २,०४२.६१

नगर           ११,७९३              ६,०३६.७७            १,०४१.५९

एकूण          ७०,६६६             ३५,८७८.८१             ६,३०९.७७

हेही वाचा :

The post नाशिक : आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँकखात्यात भरपाई appeared first on पुढारी.