नाशिक : आता अमरधाममध्येच संगणकावर होणार अंत्यसंस्काराची नोंद

संगणक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका हद्दीतील स्मशानभूमींची स्वच्छता राखण्याबरोबरच येथील अंत्यसंस्कारांची नोंद संगणकात करण्यासाठी महापालिकेकडून ठेकेदाराची चाचपणी केली जात आहे. सद्यस्थितीत ठेक्याची मुदत संपल्याने, काही दिवसांपूर्वीच महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, ठेकेदारांनी अवाच्या सव्वा दर नमूद केल्याने आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठेक्याला ब्रेक दिला होता. आता नव्याने फेरनिविदा प्रक्रिया राबविली जाणार असून, शहरातील सहाही विभागांतील स्मशानभूमी व परिसर स्वच्छतेसाठी ठेकेदाराचा शोध घेतला जाणार आहे. या ठेकेदाराने अंत्यसंस्कारांची नोंद संगणकावर करण्याची अट घातली जाणार आहे. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी चार कामगारही ठेकेदाराला नेमावे लागणार आहेत.

जुन्या ठेक्याची मुदत संपल्याने नव्या ठेकेदाराचा शोध घेताना त्याला काही गोष्टींची तरतूद करावी लागणार आहे. त्यामध्ये त्याला अद्ययावत संगणकासह वाय-फायची सुविधा स्मशानभूमीस्थळी उपलब्ध करून द्यावी लागेल. त्यासाठी संबंधित ठेकेदाराला सहाही विभागांत कर्मचारी नेमावे लागणार आहेत. त्याचबरोबर स्मशानभूमीच्या स्वच्छतेसह अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड या कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. शहरातील १७ स्मशानभूमींतील माहिती संकलित करून ती संगणकावर कुशल कामगाराच्या माध्यमातून अपलोड करावी लागणार आहे. त्यामध्ये मृताची सर्व माहिती नोंदविली जाणार आहे. पूर्वीच्या ठेक्यात याचा समावेश नव्हता.

महापालिका हद्दीत सन २००३ पासून मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जात आहे. शहरातील सर्व भागांमध्ये १७ स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींमध्ये दहनासाठी लागणारे लाकूड, रॉकेल आदी साहित्य ठेकेदारांमार्फत पुरविले जाते. एका अंत्यसंस्कारासाठी महापालिका ठेकेदाराला विशिष्ट रक्कम अदा करते. हा ठेका तीन वर्षांपासाठी दिला जातो. या ठेक्याची मुदत फेब्रुवारी २०२३ मध्ये संपुष्टात आली असून, नव्या ठेकेदारासाठी महापालिकेकडून टेंडर प्रक्रिया राबविली जात आहे. या टेंडरमध्ये महापालिकेने प्रत्येक दहनासाठी १८८३ रुपयांचा दर निश्चित केला होता. त्यात आठ मण लाकडासह रॉकेलचा समावेश होता. मात्र निविदा प्रक्रियेत सहभागी ठेकेदारांनी प्रस्तावित दरांच्या दुप्पट तीन हजार ९०० रुपये दर दिला होता. त्यातही स्वच्छता आणि मृतांची नोंद संगणकावर करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे महापालिकेने ही निविदा प्रक्रियाच रद्द केली होती. आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी केली असून, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन अंत्यविधी योजनेचा ठेका दिला जाण्याची शक्यता आहे.

दोनदा नोंदणी टळणार

यापूर्वी अंत्यविधीची नोंद करताना ती दोनदा केली जात असल्याची बाब समोर आली होती. ही बाब टाळण्यासाठी महापालिकेकडून अंत्यविधीची नोंद तत्काळ करण्यासाठी अद्ययावत संगणकासह प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची अट ठेकेदारांना घातली जाणार आहे. जेणेकरून दोनदा अंत्यविधीची नोंद टाळता येईल.

हेही वाचा :

The post नाशिक : आता अमरधाममध्येच संगणकावर होणार अंत्यसंस्काराची नोंद appeared first on पुढारी.