नाशिक : आता ‘या’ पाच प्रकारांत होणार कचर्‍याचे वर्गीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शासन आदेशानुसार आता शहर सौंदर्य अभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत कचर्‍याचे पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाणार असून, या अभियानाची सुरुवात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांपासून केली जाणार आहे. कचर्‍याचे विलगीकरण आणि वर्गीकरण संबंधितांना बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

ओला, सुका तसेच प्लास्टिक, ई वेस्ट आणि घातक कचरा अशा पाच प्रकारांत कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानापासून त्याची सुरुवात केली जाणार आहे. कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावणे सोपे जावे तसेच शहर स्वच्छतेला हातभार लागावा यासाठी कचर्‍याचे विलगीकरण तसेच वर्गीकरण करण्यात येते. याआधीपासूनच कचर्‍याचे ओला आणि सुका कचरा अशा दोन प्रकारांत विलगीकरण केले जाते. तशा सूचना मनपा प्रशासनाने घंटागाडी कर्मचार्‍यांना तसेच नागरिकांनाही दिलेल्या आहेत. मात्र, या कचरा विलगीकरणाचा विसर सध्या सर्वांनाच पडलेला असून, घंटागाडीत सर्व प्रकारचा कचरा एकत्रितच करून तो खतप्रकल्पावर नेला जातो. त्यामुळे त्याठिकाणी कचरा अलगीकरण करण्यात अडचणी येत असल्याने आणि वेळही जात असल्याने मनपाने कचरा अलगीकरणाचा मुद्दा पुन्हा समोर आणला आहे. नागरिकांमध्ये या शहर सौंदर्य अभियानाची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी या अभियानाची सुरुवात प्रथम कर्मचारी तसेच अधिकार्‍यांपासून केली जाणार आहे. कचर्‍याचे पाच प्रकारांत विभाजन करण्यासाठी पाच डस्टबिन ठेवावे लागणार असून, ते त्यांना बंधनकारक केले जाणार आहे.

घंटागाड्यांची अचानक पाहणी
घंटागाड्यांमार्फत कचर्‍याचे अलगीकरण केले जाते किंवा नाही तसेच घंटागाड्यांकडून वेळा आणि निश्चित केलेले मार्ग पाळले जातात की नाही याची मनपा आयुक्त अचानकपणे पाहणी करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या पाहणीत गैरप्रकार वा त्रुटी आढळून आल्यास संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचा :

 

The post नाशिक : आता 'या' पाच प्रकारांत होणार कचर्‍याचे वर्गीकरण appeared first on पुढारी.