नाशिक : आता रोबोटद्वारे शहरातील मलवाहिकांची होणार स्वच्छता

manholes

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उच्च न्यायालयाने मनुष्यबळ वापरून मलवाहिकांच्या चेंबरची स्वच्छता करण्यावर बंदी घातल्याने केंद्र व राज्य शासनाने आखलेल्या धोरणानुसार आता मलवाहिकांची स्वच्छता यंत्राव्दारे करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिका आपल्या सहाही विभागांसाठी सहा रोबोट मशिन खरेदी करणार असून, त्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे.

गंगापूररोडलगत सोमेश्वर परिसरात मलवाहिकेच्या स्वच्छतेकरता चेंबरमध्ये उतरलेल्या ठेकेदाराकडील दोघा कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. ही घटना २०१३-१४ मध्ये घडली होती. या घटनेनंतर २०१५ मध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीतील श्री साईश कंपनीतील सेफ्टी टॅँकमध्ये गुदमरून एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला होता. अशा स्वरूपाच्या घटना नाशिकसह इतरही महानगरांमध्ये तसेच राज्यात सातत्याने घडत असल्याने उच्च न्यायालयाने मनुष्यबळ वापरून मलवाहिकांच्या चेंबरची स्वच्छता करण्यावर बंदी घातली आहे. त्याबाबत केंद्र व राज्य शासनाने धोरण निश्चित करत त्यासंदर्भातील सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या. त्यापार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने देखील शहरातील मलवाहिकांच्या स्वच्छतेसाठी रोबोट मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, सहाही विभागांसाठी सहा मशिनरी खरेदी करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.

रोबोट मशिन खरेदीसाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महापालिकेच्या मल:निस्सारण विभागाने घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या आहेत. येत्या काळात रोबोट मशिन खरेदी करण्याकरता स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक : आता रोबोटद्वारे शहरातील मलवाहिकांची होणार स्वच्छता appeared first on पुढारी.