नाशिक : आदिम कुटुंबातील शाळाबाह्य मुले आश्रमशाळेत रुजू

वंचित मुले www.pudhari.news

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
टिचभर पोटासाठी दोन-तीन हजारांत पोटच्या लेकरांना मेंढपाळांना विकण्याची नामुष्की आलेल्या आदिम कुटुंबातील शाळाबाह्य अल्पवयीन मुलांची श्रमजीवी संघटना व प्रशासनाने सोडवणूक केली. त्यांना शहापूर येथील शासकीय माध्यमिक निवासी आश्रम शाळेत रुजू करण्यात आले. ‘ती’ च्या मृत्यूनंतर ‘ती’ चे भावबंद मुक्त झाले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून आनंद वाहत होता.

ऑगस्ट महिन्यात इगतपुरी तालुक्यातील उभाडे वस्तीवरील गौरी आगीवले या दहा वर्षीय मुलीचा मेंढपाळांनी वेठबिगारीस नेऊन मारहाण केल्याने मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली होती. विधानसभेत आमदार हिरामण खोसकर यांनी लक्षवेधी करत सभागृहाचे लक्ष वेधले होते. सदर वस्तीला श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष तथा आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष केबिनेट मंत्री विवेक पंडित, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., उपविभागीय अधिकारी माधुरी कांगणे, तहसीलदार
परमेश्वर कासुळे यांनी भेट देत आदिम कातकरी कटुंबियांना मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रोजगार देण्याबाबत आश्वासन दिले होते. यानंतर श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येऊन वेठबिगारी कायद्यानुसार परजिल्ह्यातील सात इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने 13 विद्यार्थी निवासी आश्रम शाळेत रुजू करण्यात आले आहे. यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे, तालुकाध्यक्ष गोकुळ हिलम, सचिव सुनील वाघ आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : आदिम कुटुंबातील शाळाबाह्य मुले आश्रमशाळेत रुजू appeared first on पुढारी.