नाशिक : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मार्ग मोकळा

फेलोशिप योजना www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बार्टी, सारथी आणि महाज्योती यासारख्या स्वायत्त संस्थेच्या धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात टीआरटीआयच्या माध्यमातून आदिवासी पीएचडी संशोधकांसाठी फेलोशिप योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या पीएचडी संशोधन अधिछात्रवृत्ती अर्थात फेलोशिपचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्रातील विविध नामांकित विद्यापीठात दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजातील विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहेत. मात्र, हे शिक्षण घेण्यासाठी येणारा खर्च पुर्ण करण्याची संबंधित विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबाची आर्थिक क्षमता नाही. त्यातच राज्य शासनाकडून फेलोशिप मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण अर्ध्यावर सोडत आहे. फेलोशिपअभावी आदिवासी विद्यार्थ्यांचे पीएचडी मिळविण्याचे स्वप्न भंग पावत असून, त्यामुळे आदिवासी समाजच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला जाण्याची भीती संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त करण्यात येते. फेलोशिप देण्याच्या प्रमुख मागणीसाठी आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन राज्यातील आदिवासी भागाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आमदारांनी फेलोशीपचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना ‘टीआरटीआय’च्या माध्यमातून फेलोशीप देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे फेलोशिपच्या प्रतिक्षेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.