नाशिक : आदिवासी हेच देशाचे मूळ मालक : बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्यपूर्व काळापासून वनजमीन कसणाऱ्या आदिवासी बांधवांवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात येत होता. केंद्रातील युपीए सरकारच्या काळात आदिवासी समाजाला वनहक्क कायद्यांतर्गंत जमिनी देण्यास मंजुरी मिळाली. जमिनींचे खरे मालक असलेल्या आदिवासी समाजाने वनजमिनींवरील अतिक्रमण खोडून काढत त्यांचे नाव सात-बाराच्या उताऱ्यावर लावण्याचे काम कॉंग्रेसने केल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

ईदगाह मैदान येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आयोजित जागतिक आदिवासी दिनाच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर परिषदेचे युवा राज्याध्यक्ष लकी जाधव, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, माजी नगरसेवक राहुल दिवे, ज्येष्ठ नेते संपत सकाळे, जनार्दन माळी, राजेंद्र वाघेले, रामदास धांडे, किरण राजवाडे, गणेश गवळी, गोरख बोडके आदी उपस्थित होते. आदिवासी समाजाने संघटीत होवून लकी जाधव यांच्या पाठीमागे ताकद उभी करावी, असे आवाहन थोरात यांनी केले. यावेळी आ. थोरात म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांना भूमिगत करण्यासह अन्य मदतीसाठी आदिवासी समाज तत्पर होता. स्वातंत्र्य मिळविण्यात आदिवासी समाजाचा मोठा वाटा असून, हे काेणालाही नाकारता येणार नाही. काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्यपुर्व काळापासून आदिवासी समाजा बदद्ल विशेष प्रेम आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदिवासींच्या हद्यात विशेष स्थान आहे. राज्यघटनेमुळे आदिवासी समाजाला समान न्याय मिळाल्याचे थोरात यांनी सांगितले. दरम्यान, या कार्यक्रमात आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांना ‘धरती भगवान बिरसा मुंडा’ तर मनपा सहआयुक्त अशोक आत्राम यांना आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

नवीन मंत्रीमंडळाला शुभेच्छा :- राज्य मंत्रीमंडळाचा तब्बल ३९ दिवसांनंतर विस्तार झाला असून, अखेर दोनाचे वीस झाले आहेत. मंत्रिमंडळात काही भ्रष्टाचारी व आरोप असलेल्या आमदारांना मंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यांना त्यांच्यासह नवीन मंत्रीमंडळाला ‘आज केवळ शुभेच्छा, उद्यापासून पुढे काय ते पाहू’ असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लगावला.

हेही वाचा:

The post नाशिक : आदिवासी हेच देशाचे मूळ मालक : बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.