नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा

आधारकार्ड दुरुस्ती कामासाठी शासकीय फी 50 रुपये आहे. परंतु काही दलाल गोरगरीब जनतेकडून 100 ते 200 रुपयांची मागणी केली जात आहे.

वृद्ध, दिव्यांग व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना शासकीय फीदेखील माफ असतेे. नागरिकांनी नियमानुसार 50 रुपये फी भरून पावती घ्यावी. कुणी वाढीव पैशांची मागणी करत असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असा इशारा आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी दिला आहे. आमदार मुफ्ती यांना या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लक्ष्मण चव्हाण यांची भेट घेऊन हा प्रकार लक्षात आणून दिला. पूर्वी आधारकार्डच्या दुरुस्ती अर्जावर आमदारांची स्वाक्षरी व शिक्का चालत होता. परंतु शासनाने यात बदल करून वर्ग एक दर्जाच्या शासकीय अधिकार्‍यांची सही व पदाचा शिक्का अनिवार्य केला आहे. बहुतांश नागरिक या अर्जावर सही व शिक्का घेण्यासाठी सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांकडे जात आहेत. काही दलाल या कामासाठी नागरिकांकडून वाढीव पैशांची मागणी करत असल्याचा आरोप आमदार यांनी केला. डॉ. चव्हाण यांनी पैशांची आकारणी होत नसल्याचे सांगितले. यावेळी सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश पाटील, डॉ. अनिस मोमीन, शफीक शेख, खालीद सिकंदर उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’ appeared first on पुढारी.