नाशिक : आधार लिंकिंगमुळे शैक्षणिक कामांची तुटली लिंक

Adhar www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आधारकार्ड मतदारकार्डाला लिंक करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेकरता शहरातील खासगी आणि महापालिकेच्या शाळांमधील जवळपास 75 टक्के शिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आल्याने शाळांमधील अध्यापनासह इतरही शैक्षणिक काम बंद झाले आहे. आधारकार्ड लिंकिंग करणे ऐच्छिक असल्याने हे कामकाजदेखील ऐच्छिक करण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे.

मतदान करताना होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसावा याकरता राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनामार्फत आधारकार्ड मतदारकार्डाला लिंक करण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने या कामासाठी शहरी भागात महापालिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कर्मचारी वर्ग करण्याची सूचना केली आहे. कर्मचारी वर्ग करताना शासनाने सूचनापत्रात कामाचे स्वरूप इच्छुक असे म्हटले आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाकडून मात्र बळजबरी केली जात असल्याचा आरोप शिक्षकांकडून केला जात आहे. या कामाकरता महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुली विभागातील जवळपास 135 कर्मचारी वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे कर वसुलीवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच महापालिकेच्या शाळांमधील 70 शिक्षक या कामासाठी वर्ग झाले आहेत. काही शिक्षक हे निवडणुकीच्या कामासाठी वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे अशा संबंधित शाळांमधील अध्यापनाचे कामकाज काही प्रमाणात ठप्प झाले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : आधार लिंकिंगमुळे शैक्षणिक कामांची तुटली लिंक appeared first on पुढारी.