नाशिक : आनंदाची गुढी…स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत

मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.२२) वाजतगाजत उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील श्री साक्षी गणपती मंदिर भद्रकाली, काळाराम मंदिर आणि कौशल्यानगर रामवाडी या तीन ठिकाणांवरून नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही यात्रांचा समारोप गोदाघाटावरील पाडवा पटांगण येथे झाला.

पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी काळाराम मंदिरासमोर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते गुढीपूजन पार पडले. यावेळी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे, मनपा जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम उपस्थित होते. गुढीपूजन झाल्यानंतर पारंपरिक ढोल पथकांचे वादन झाले. शौर्य प्रात्यक्षिके, कराटे प्रात्यक्षिके, मंगळागौर खेळ, महिलांची बाइक रॅली, भजनी मंडळ, लेजीम पथक, तलवार पथक, चित्ररथ, ढोल पथक, मल्लखांब आणि मर्दानी खेळांचे पथक शाेभायात्रेत सहभागी झाले होते. स्वागत यात्रांना नाशिककरांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. गुढीपाडव्यानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी स्वागत यात्रांचे जल्ल्लोषात स्वागत झाले. पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची ग्वाही मनपा आयुक्तांनी यावेळी दिली. स्वागत यात्रांच्या नियोजनासाठी वृषाली घोलप, सुचेता भानुवंशे, प्रदीप भानुवंशे, मोहन गायधनी, प्रतीक शुक्ल, अश्विनी चंद्रात्रे, प्रियंका लोहिते, केतकी चंद्रात्रे, मंदार कावळे, केदार शिंगणे, बापू दापसे, शेखर जोशी, कौस्तुभ अष्टपुत्रे, शिवम बेळे, शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, महेश महांकाळे, प्रसाद गर्भे यांनी मेहनत घेतली.

पाडवा पटांगणावर नाशिककरांची दाद

१८ ते २१ मार्च या कालावधीत मनपा व नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे गोदाघाटावर महावादन, अंतर्नाद, महारांगोळी, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके अशा संस्कृती जपणाऱ्या व वाढवणाऱ्या कार्यक्रमांचे पाडवा पटांगणावर यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सर्वच कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उपनगरांमध्ये शोभायात्रा

मुख्य शोभायात्रेबरोबरच पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर या भागांतदेखील मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात मराठी नववर्षाचे स्वागत करणाऱ्या शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. या शोभायात्रेत शाळांमधील विद्यार्थ्यांसह नागरिक सहभागी झाले होते.

हेही वाचा:

The post नाशिक : आनंदाची गुढी...स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत appeared first on पुढारी.