नाशिक : आपत्तीग्रस्तांना दोन दिवसांत मदत देण्याच्या ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या सूचना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
आपत्तीग्रस्त भागाचे पंचनामे करून त्यांना दोन दिवसांत भरीव मदत मिळेल, अशा पद्धतीने कार्यवाही करावी, अशा सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला केल्या.

शहरातील सरस्वती नदीच्या पुराने नुकसान झालेल्या भागाची पाहणी ना. महाजन, खासदार हेमंत गोडसे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी गंगाथरन डी., प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, प्रभारी तहसीलदार सागर मुंदडा, मुख्याधिकारी संजय केदार, उपमुख्याधिकारी रोहित पगार, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, आमदार राहुल ढिकले आदी उपस्थित होते. नदीलगतची झोपडपट्टी व येथील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचे तातडीने पंचनामे करावे, नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. गावाबाहेरील देवी मंदिर परिसरातील झोपडपट्टीत नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. त्यानंतर पूल भागात सरस्वती नदीची पाहणी करून प्रशासनाला स्वच्छतेबाबत सूचना केल्या. नाशिक वेस भागातून शॉपिंग सेंटरमधील व्यावसायिकांच्या व्यथाही त्यांनी जाणून घेतल्या. नवा पूल भागात पाहणी करीत नेहरू चौकात दुकानदारांचे झालेले नुकसानही त्यांनी डोळ्याखालून घातले. पूरग्रस्तांच्या जेवण्याची तसेच राहण्याची व्यवस्था व त्यांना आवश्यक वापरातील वस्तूंची गरज भागविण्याच्या सूचना केल्या.

अतिक्रमणधारकांचे सर्वेक्षण :
सरस्वती नदीलगतच्या झोपडपट्टीवासीयांचे सर्वेक्षण करावे. पुन्हा अशी स्थिती येऊ नये, याकरिता त्यांना अन्य शासकीय जागा शोधून त्या ठिकाणी म्हाडा अथवा अन्य योजनेंतर्गत पुनर्वसनासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही ना. महाजन म्हणाले. तशा सूचना त्यांनी मुख्याधिकार्‍यांना दिल्या.
रस्त्यांची डागडुजी करा :
ना. महाजन यांनी पांढुर्ली शिवारातही नुकसानीची पाहणी केली. तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना मदतीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या. तालुक्यात बर्‍याच ठिकाणी रस्ते, पूल वाहून गेले आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पावले उचलावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना केल्या.

हेही वाचा:

The post नाशिक : आपत्तीग्रस्तांना दोन दिवसांत मदत देण्याच्या ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या सूचना appeared first on पुढारी.