नाशिक : आमच्या माणसाचे नाव यादीत आहे का?

अपघात www.pudhari.news

नाशिक : गौरव जोशी
वेळ सकाळी 11 वाजताची… कुठे नातेवाइकांचा आक्रोश… तर कुठे यंत्रणांकडून मृतांची ओळख पटविण्यासाठी सुरू असलेली धावपळ… अशात काही व्यक्ती येऊन उपस्थित पोलिसांना धीरगंभीर आवाजात साहेब, मयतांच्या यादीत आमच्या माणसाचे नाव आहे का सांगा, असे आर्जव करतात. मन हेलावून टाकणारी ही घटना जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाबाहेर शनिवारी (दि.8) उपस्थितांनी अनुभवली अन् नकळत त्यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.

औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाका येथे हॉटेल मिरचीसमोर पहाटे लक्झरी बसच्या अपघातात मृत्यू झालेल्या 12 प्रवाशांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताची बातमी वार्‍यासारखी पसरल्यानंतर मृतांच्या नातेवाइकांनी रुग्णालय गाठले. अपघातात बसमधील मृत प्रवाशांच्या शरीराचा कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले. त्यामुळे शवविच्छेदन कक्षाबाहेरच पोलिसांनी मदत कक्ष स्थापन केला. या कक्षात आलेल्या नातेवाइकांकडून मृतांची सविस्तर माहिती घेत जागेवरच अहवाल तयार करून बॉडी हस्तांतरित करण्यात येत होती. सकाळी 11 पासून सुरू झालेली ही प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत कायम होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मात्र, रुग्णालयातील गोंधळामुळे योग्य ती माहिती उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांनी थेट शवविच्छेदन विभाग गाठला. तेथे मयतांच्या यादीत आपल्या व्यक्तीचे नाव आहे का याची खातरजमा ते करत होते. दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण यादी तपासल्यानंतर त्यात नसल्याचे सांगताच उपस्थितांमधील काही नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर यादीत नाव असणार्‍यांना पोलिसांकडून शवविच्छेदन कक्षात जाऊन ओळख पटविण्यास सांगण्यात येत होतेे. यावेळी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचार्‍यांकडून मृतांच्या नातेवाइकांना धीर दिला जात होता.

प्रशासनाकडून मदत कक्ष : अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला. या कक्षातून अपघातामधील जखमी तसेच मृतांबद्दलची माहिती देण्यात येत होती. तसेच संपर्कासाठी 0253- 2572038 व 0253-2576106 हे हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले असून, या कक्षात जिल्हा रुग्णालयाचे मनोज जगताप आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील व्ही.आर. महाले हे नातेवाइकांना माहिती देत होते.

अन् जीवाची घालमेल :  अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीच्या यवतमाळ येथील कार्यालयात संपर्क साधत प्रवाशांची नावे आणि माहिती घेतली. परंतु, बसचालकांनी वाटेत काही प्रवासी बसमध्ये भरले. त्यामुळे संबंधित प्रवाशांची माहिती स्थानिक यंत्रणेला तातडीने उपलब्ध झाली नाही. त्यामुळे ओळख लागेपर्यंत उपस्थित नातेवाइकांच्या जीवाची घालमेल सुरू होती.

हेही वाचा:

The post नाशिक : आमच्या माणसाचे नाव यादीत आहे का? appeared first on पुढारी.