नाशिक : आयमाचा निर्यात व्यवस्थापक अभ्यासक्रम दिशादर्शक ठरेल : जिल्हाधिकारी

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

आयमा आणि सिम्बॉयसिस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला निर्यात व्यवस्थापक अभ्यासक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरेल. नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांत क्षमता असून तसेच जिल्ह्यात असलेल्या पोषक वातावरणाचा लाभ निश्चितच निर्यातवाढीसाठी होईल असा विश्वास जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी व्यक्त केला.

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) आणि सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या एक्सपोर्ट मॅनेजर प्रोग्रॅम (एएमपी) अभ्यासक्रमाचा शुभारंभ हॉटेल रेडिसन (पाथर्डीफाटा) येथे जिल्हाधिकारी गंगाथरन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, डीआयसीचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, सिम्बॉयसिसच्या डीन वंदना सोनवणे, आयमाच्या निर्यात विषयक समिती अध्यक्ष हर्षद ब्राह्मणकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आदी होते.

नाशिक जिल्ह्यातून कांदा आणि द्राक्षाची मोठ्याप्रमाणात निर्यात होते. वाईन निर्मितीतही नाशिक अग्रेसर असून ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. नाशकातील उद्योजक एकमेकांना सहकार्य करतात ही बाब वाखाणण्याजोगी आहे. आपल्यातील उणिवा शोधून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करून निर्यातीच्या क्षेत्रात नाशिकचे नाव उंचाविण्यासाठी त्यांनी आणखी सकारात्मक पावले उचलावीत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

आयमा आणि सिम्बॉयसिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम स्तुत्य आणि राज्यातील नाविन्यपूर्ण असल्याचे डीआयसीचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी सांगितले. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी आपल्या भाषणात आयमाने निर्यातदार घडविण्यासाठी जो उपक्रम हाती घेतला त्याचे कौतुक केले. रोजगार निर्मितीसाठीही हा अभ्यासक्रम महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उद्घाटन सोहळ्यानंतर चर्चासत्र पार पडले. एबीपीचे गणेश कोठावदे, सह्याद्री फार्मचे अजहर तंबुवाला, फ्रेश ट्रॉप फ़ुड्सचे मयंक टंडन, सुला वाईन्सचे संजीव पैठणकर, फॉक्स ऑटोमोशनचे जॉय अलूर व टेक्नोफोर्सच्या मधुर पाटील यांनी त्यात सहभाग घेतला. सूत्रसंचलन निर्यात समितीचे सहअध्यक्ष रवी महादेवकर यांनी केले. निर्यातीसाठी आवश्यक असलेली कौशल्ये, कोणत्या वस्तूंची कोणत्या देशात निर्यात करावी, त्याबाबत येणाऱ्या अडचणी, कायदेशीर बाबी यांची माहिती उद्योजकांनी दिली.

आयमाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हाच निर्यात व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करून नाशकातून जास्तीतजास्त निर्यातदार घडविण्याचे स्वप्न आपण बघितले होते आणि आज हे स्वप्न साकार होत आहे. याचा मला अभिमान वाटतो असे सांगून आयमा अध्यक्ष निखील पांचाळ यांनी प्रास्ताविकात आयमाचा इतिहास तसेच आत्तापर्यंत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आयमाच्या निर्यात विषयक समितीचे चेअरमन हर्षद ब्राह्मणकर आणि सहअध्यक्ष सिद्धेश रायकर यांनी निर्यात क्षेत्रात नाशिकला कसा वाव आहे याची माहिती करून देतांना नाशिकला जागतिक नकाशावर आणण्यासाठी आयमा आपले सर्वस्व पणास लावेल असा निर्धार मनोगतात व्यक्त केला.

चार महिन्यांचा हा अनोखा अभ्यासक्रम असून पहिल्या टप्प्यात 25 उद्योजकांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांत 200 जणांना या कार्यक्रमांतर्गत सामावून घेण्यात येईल, असे वंदना सोनवणे आपल्या भाषणात म्हणाल्या. यावेळी पहिल्या बॅचच्या उद्योजकांची उपस्थितांना ओळख करून देण्यात आली.  यावेळी प्रिया पांचाळ आणि आदित्य गोगटे यांनी या अभ्यासक्रमात का सहभागी झाले याची माहिती दिली. कार्यक्रमास आयमाचे बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सचिव गोविंद झा, योगिता आहेर, कोषाध्यक्ष राजेन्द्र कोठावदे, वरुण तलवार, लघुउद्योग भरतीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी, निखील तापडिया, जे.आर.वाघ, संजय महाजन, कुंदन डरंगे, अभिषेक व्यास, जयंत पगार, अजय यादव, अलोक कानांनी, सुधाकर देशमुख, मनोज मुळे, देवेन्द्र विभुते, राधाकृष्ण नाईकवाडे, मधुकर ब्राह्मणकर तसेच विविध निर्यातदार उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ललित बूब यांनी आभार मानले.

The post नाशिक : आयमाचा निर्यात व्यवस्थापक अभ्यासक्रम दिशादर्शक ठरेल : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.