नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना फटका

चांदवड www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
बांगलादेशाने भारतातून येणार्‍या द्राक्ष, डाळिंब पिकांवर आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविल्याने द्राक्षाचे दर किलोला 40 ते 50 रुपयांनी घसरून द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसला आहे. त्यासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारशी तातडीने बोलणी करून त्यांचे आयात शुल्क कमी करण्याबाबत चर्चा करावी, अशी मागणी वडनेरभैरवच्या द्राक्ष बागायतदारांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली आहे.

वडनेरभैरव परिसरातील द्राक्ष खरेदीसाठी बांगलादेशासह इतर देशांतील व्यापारी मोठ्या संख्येने येतात. मात्र, बांगलादेशने द्राक्ष, डाळिंब व संत्रा पिकांवरील आयात शुल्कात मागच्या वर्षापेक्षा चालूवर्षी दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे बांगलादेशात द्राक्ष विक्री करण्यासाठी व्यापार्‍यांना दुप्पट खर्च येणार आहे. त्यामुळे द्राक्ष खरेदीसाठी तेथील व्यापारी तयार नाहीत. द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने त्याचा फटका थेट शेतकर्‍यांना बसणार आहे. म्हणून भारत सरकारने बांगलादेशाशी चर्चा करून मार्ग काढून द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी वडनेरभैरवचे सरपंच सुनील पाचोरकर, उपसरपंच योगेश साळुंके, बाळासाहेब माळी, दिलीप धारराव, संजय पाचोरकर, रावसाहेब भालेराव यांनी ना. डॉ. पवार यांच्याकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री नरेद्र तोमर यांची भेट घेऊन बांगलादेशाशी चर्चा करण्यात येईल. त्यातून नक्कीच द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचा मार्ग निघेल. – डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री.

हेही वाचा:

The post नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना फटका appeared first on पुढारी.