Site icon

नाशिक : आयुष्मान गोल्डन कार्डसाठी विशेष मोहीमेस प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत आणि जिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे आयुष्मान भारतचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी पंधरा दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आपले सरकार सेवा केंद्र व ग्रामपंचायतीमध्ये मोफत स्वरूपात इ-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढून घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात गोल्डन कार्ड योजनेसाठी १६ लाख ७ हजार १४४ लाभार्थी पात्र ठरले आहेत. आजपर्यंत सरासरी ४ लाख ९० हजार लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचे इ-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढलेले आहे. कोरोनामुळे दोन वर्ष या योजनेत लाभार्थीचा सहभाग कमी होता. तर उर्वरित सरासरी ११ लाख व्यक्तींचे गोल्डन कार्ड काढणे बाकी आहे. जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीना विविध आजारावर उपचार व शस्त्रक्रियांसाठी जिल्ह्यातील ६३ सरकारी व खाजगी रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. आयुष्मान भारतचे इ-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढल्यास विविध १२०९ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे. आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थ्यांना ५ लाख रुपयेपर्यंत वैद्यकीय संरक्षण मिळते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी एक लाख ५० हजार रुपयेपर्यंतचे वैद्यकीय संरक्षण मिळते तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी दोन लक्ष ५० हजार रुपयांची तरतूद केली आहे.

आवश्यक कागदपत्रे अशी….
आयुष्मान भारत इ-कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेले आयुष्यमान भारतचे पत्र, रेशन कार्ड किंवा आधार कार्ड ही कागदपत्रे घेऊन जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे, स्वतःचा मोबाईल क्रमांक जवळ ठेवावा. त्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीस द्यावा म्हणजेच इ कार्ड त्वरित तयार होऊन आपल्याला उपलब्ध होईल, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

हेही वाचा:

The post नाशिक : आयुष्मान गोल्डन कार्डसाठी विशेष मोहीमेस प्रारंभ appeared first on पुढारी.

Exit mobile version