नाशिक : आलिशान कारच्या बहाण्याने 10 लाखांना गंडा

फसवणूक

नाशिक : बीएमडब्ल्यू कंपनीत मोठ्या पदावर असल्याचे भासवत भामट्याने शहरातील दोघांना स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चेतन मारुती प्रभू (33, रा. गंगापूर रोड) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

चेतन प्रभू यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना दि. 11 ते 29 एप्रिल दरम्यान अमितकुमार घोष या संशयिताने गंडा घातला. चेतन यांना फोन करून, तो बीएमडब्ल्यू कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे भासविले. बीएमडब्ल्यूची 2 सिरीजची कार मूळ किमतीच्या 55 टक्के स्वस्त दरात देण्याचे आमिष चेतन यांना दाखविले. त्यासाठी त्याने केलेल्या पैशांच्या मागणीनुसार चेतन यांनी 29 एप्रिलला ऑनलाइन पद्धतीने भामट्याने दिलेल्या बँक खात्यात पाच लाख रुपये भरले. चेतन यांचा मित्र अरुणकुमार दाणा यांनीही कार घेण्यासाठी भामट्याला दि. 11 एप्रिलला ऑनलाइन पद्धतीने चार लाख रुपये दिले होते. त्यानंतर संशयिताची पत्नी बिपाशा भौमिक हिला आरटीजीएसद्वारे 50 हजार रुपये व रोख स्वरुपात 50 हजार रुपये दिले होते. पैसे दिल्यानंतरही कार मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे दोघांच्याही लक्षात आले. त्यामुळे चेतन यांनी गंगापूर पोलिस ठाणे गाठून संशयित अमित घोषने 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : आलिशान कारच्या बहाण्याने 10 लाखांना गंडा appeared first on पुढारी.