नाशिक : आवक घटल्याने पितृपक्षात भाजीपाला महागला

पितृपक्ष www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून धो-धो पाऊस बरसत असल्याने, शेतमालाची आवक प्रभावित झाली आहे. सामान्य परिस्थितीच्या तुलनेत पालेभाज्यांची अवघ्या 40 ते 45 टक्के इतकी आवक असल्याने दर कडाडले आहेत. आवक घटण्यासह पावसामुळे विक्रेत्यांकडील भाजीपालाही खराब होत असल्याने, त्याचा परिणाम भाज्यांचे दर वधारण्यावर होत आहे. दरम्यान, पितृपक्ष सुरू झाल्याने भाजीपाल्यासह फळभाज्यांना नेहमीच्या तुलनेत मागणी वाढली आहे.

अगोदरच महागाईने सर्वसामान्य हतबल झाले असतानाच आता दैनंदिन लागणार्‍या भाजीपाल्याचे दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. नाशिकमधील विविध भागांत भरणार्‍या बाजारातील भाजीपाला तसेच फळभाज्यांचे दर आवक किती यावर अवलंबून असतात. शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाल्यानंतर तो विक्रेत्यांकडून खरेदी केला जातो. त्यानंतर त्याची किरकोळ बाजारात विक्री केली जाते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शहरी भागालगतच्या मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव यासह पेठ, सुरगाणा, सिन्नर, निफाड इतर भागांतून भाजीपाला दाखल होतो. नाशिक शहरासह मुंबई व गुजरातमध्ये देखील जिल्ह्यातून भाजीपाला पाठविला जातो. मात्र, आता आवकच कमी झाल्याने, मुंबई, गुजरातमध्ये भाजीपाला पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

बजेट कोलमडले : गेल्या काही दिवसांपासून धो-धो पाऊस बरसत असल्याने, पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसामुळे भाजीपाला सडत असल्याच्या देखील शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. अशात भाजीपाला मोठ्या प्रमाणात महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

येथून भाजीपाला होताे दाखल : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शहरी भागालगतच्या मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव यासह पेठ, सुरगाणा, सिन्नर, निफाड इतर भागांतून भाजीपाला दाखल होतो.

किलोप्रमाणे असे आहेत दर…  टोमॅटो 80 रुपये, वांगी 80 रुपये, ढो. मिरची 80 रुपये, गिलके 80 रुपये, दोडका 80 रुपये, भेंडी 100 रुपये, गवार 120 रुपये, काकडी 100 रुपये, कारले 100 रुपये, मिरची 120 रुपये.

नगप्रमाणे : फ्लॉवर 40 रुपये, कोबी 30 रुपये, भोपळा 30 रुपये.

जुडीप्रमाणे : मेथी 50 रुपये, पालक 25 रुपये, शेपू 40 रुपये, कोथिंबीर 80 रुपये.

हेही वाचा:

The post नाशिक : आवक घटल्याने पितृपक्षात भाजीपाला महागला appeared first on पुढारी.