नाशिक : आशा बगे जनस्थान पुरस्काराच्या मानकरी

ज्येष्ठ साहित्यिका आशा बगे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ दर दोन वर्षांनी दिला जाणारा यंदाचा 17 वा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका आशा बगे यांना जाहीर झाला असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत टकले, लोकेश शेवडे, विलास लोणारी, मकरंद हिंगणे, प्रकाश होळकर, अरविंद ओढेकर, अ‍ॅड. राजेंद्र डोखळे उपस्थित होते.

एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून दि. 10 मार्च रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. डॉ. अनुपमा उजगरे, संध्या नरे-पवार, प्रफुल्ल शिलेदार, डॉ. सदानंद बोरसे, अविनाश सप्रे यांनी जनस्थान पुरस्कार निवड समितीचे काम पाहिले. यंदाचा 17 वा जनस्थान पुरस्कार असून याआधी मधु मंगेश कर्णिक, वसंत आबाजी डहाके, विजया राजाध्यक्ष, अरुण साधू, भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, ना. धों. महानोर, बाबूराव बागूल, नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर, श्री. ना. पेंडसे, व्यंकटेश माडगुळकर, गंगाधर गाडगीळ, इंदिरा संत, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर जनस्थान पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. त्यांनी नोकरी न करता घर-संसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला आहे. त्यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची ‘रुक्मिणी’ कथा 1980 साली प्रसिद्ध झाली. आशा बगे यांची 2018 पर्यंत 13 लघुकथासंग्रह, सात कादंबर्‍या, ललित लेखांची दोन पुस्तके प्रसिद्ध अशी साहित्यसंपदा प्रसिद्ध झाली आहे.

आशा बगे यांचे प्रकाशित साहित्य
अनंत (कथासंग्रह), अनुवाद (माहितीपर), ऑर्गन (कथासंग्रह), ऋतूवेगळे (कथासंग्रह), चक्रवर्ती (धार्मिक), चंदन (कथासंग्रह), जलसाघर (कथासंग्रह), त्रिदल (ललित), दर्पण (कथासंग्रह), धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (ललित कथा), निसटलेले (कथासंग्रह), पाऊलवाटेवरले गाव (कथासंग्रह), पूजा (कथासंग्रह), प्रतिद्वंद्वी (कादंबरी), भूमिला आणि उत्सव (कथासंग्रह), भूमी (कादंबरी), मांडव, मारवा (कथासंग्रह), मुद्रा (कादंबरी), सेतू (कादंबरी).

पुरस्कार आणि सन्मान
‘दर्पण’ या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार
2006 : ‘भूमी’साठी साहित्य अकादमी पुरस्कार
2012 : मालतीबाई दांडेकर पुरस्कार
2018 : राम शेवाळकर यांच्या नावाचा साहित्यव—ती पुरस्कार
विदर्भ साहित्य संघ संमेलनाचे अध्यक्षपद

हेही वाचा:

The post नाशिक : आशा बगे जनस्थान पुरस्काराच्या मानकरी appeared first on पुढारी.