नाशिक : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मृत्यू

file photo

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या जोपूळ, ता. दिंडोरी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील 11 वर्षीय मुलाच्या पोटात दुखत असल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या जोपूळ, ता. दिंडोरी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला संकेत ज्ञानेश्वर गालट (११,रा. सावर्णा, ता. पेठ) या विद्यार्थ्याला सोमवारी (दि.१३) किरकोळ खोकला व घसा दुखत असल्याने शिक्षकांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र खेडगाव येथे तातडीने उपचाराकरिता नेले. त्यानंतर आश्रमशाळेच्या निवासी वसतिगृहाच्या ठिकाणी संकेत आला असताना गुरुवारी (दि.१६) त्याच्या पोटात दुखू लागल्याने पुन्हा शिक्षकांनी संकेतला खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचाराकरिता संकेतला जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यास सांगितले. संकेतला जास्तच अस्वस्थ वाटू लागल्याने शिक्षकांनी त्याला जवळील पिंपळगाव बसवंत येथील खासगी राधाकृष्ण रुग्णालयात नेले. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी यांनीदेखील जिल्हा रुग्णालयातच नेण्याचे सुचित केले.

त्यानंतर पिंपळगाव बसवंत येथीलच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी संकेतला मृत म्हणून घोषित केले. मृत मुलाची माहिती नातेवाइकांना कळविण्यात आली असून, जिल्हा रुग्णालय येथे शव विच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे. तर वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मृत्यू appeared first on पुढारी.