नाशिक : आषाढी वारी टोलमाफीसाठी पोलिसांकडून मिळणार पासेस

आषाढी वारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीसाठी पंढरपूरला जाणार्‍या भाविकांच्या वाहनांसाठी टोलमाफीची घोषणा केली होती. भाविकांसह वारकर्‍यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील पोलिस ठाण्यांतून नोंदणीकृत वाहनांना पासेस दिले जाणार आहेत.

आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे जाताना व येताना भाविक, वारकर्‍यांच्या जड आणि हलक्या वाहनांसाठी पथकरांतून सवलत देण्यात आलेली आहे. मात्र, टोलनाक्यावरील कर्मचारी टोलमाफीचा अध्यादेश मिळाला नसल्याचे सांगत वारकर्‍यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला टोलनाका कर्मचार्‍यांकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे. त्यामुळे वारीसाठी हलक्या व जड वाहनांनी जाणार्‍या भाविकांसाठी पासेस उपलब्ध करून देण्याची जबाबदरी पोलिस यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाण्यांतर्फे हे पास वितरित केले जातील. भाविक, वारकर्‍यांनी जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये जाऊन त्यांच्या वाहनांसाठी पास उपलब्ध करून घ्यावेत, असे आवाहन पोलिस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : आषाढी वारी टोलमाफीसाठी पोलिसांकडून मिळणार पासेस appeared first on पुढारी.