नाशिक : इंदिरानगर बोगद्याची लांबी वाढणार

इंदिरा नगर बोगदा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील इंदिरानगर, राणेनगर, लेखानगर, दीपालीनगर या भागातील सतत होणार्‍या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी इंदिरानगर आणि राणेनगर येथील बोगद्याची लांबी वाढविण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव आज खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्राकडे सादर केला आहे. यामुळे आता इंदिरानगर आणि राणेनगर येथील दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी 15 मीटरने वाढणार असून एक- एक बोगदा 40 मीटर लांबीचा होणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली.

राणेनगर आणि इंदिरानगर हे दोन्ही बोगदे नाशिक-मुंबई महामार्गावर आहेत. सिडको आणि शहर यांना जोडणारे हे दोन्ही बोगदे आहेत .बोगद्याच्या वरील बाजूस महामार्ग असून, बोगदयांना समांतरही महामार्ग आणि दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड आहेत. शहराच्या मुख्य दोन उपनगरांना जोडणारे हे बोगदे असल्याने सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होते. तासनतास या बोगदे परिसरातील वाहतुकीच्या कोंडीत वाहने अडकून पडत असतात. यामुळे वेळेचा अपव्यय होऊन पेट्रोलची मोठी नासाडी होत असते. परिणामी वाहनधारकांची मोठी कुचंबणा होते. या जाचातून वाहनधारकांची कायमचीच सुटका करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील आहेत.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार गोडसे यांनी नॅशनल हायवे प्रशासनाला दिले होत्या. राणेनगर, इंदिरानगर येथील बोगदे शिवारात वाहतुकीची कोंडी का होते? याची कारणे शोधण्यात आली असून, यातूनच बोगद्यांची लांबी वाढवण्याचा निर्णय नॅशनल हायवे प्रशासनाने घेतला आहे. आजमितीस दोन्ही ठिकाणच्या बोगद्याची लांबी 25 मीटर इतकी असून, आता प्रत्येक बोगद्याच्या मागील आणि पुढील बाजूस साडेसात मीटर बोगद्याची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक बोगद्याची लांबी आता 25 मीटरऐवजी 40 मीटर इतकी होणार आहे. यासाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खासदार गोडसे यांच्या सूचनेवरून नॅशनल हायवे प्रशासनाने याविषयीचा प्रस्ताव तयार केला आहे. खासदार गोडसे यांनी हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे सादर केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : इंदिरानगर बोगद्याची लांबी वाढणार appeared first on पुढारी.