नाशिक : इंदिरानगर, राणेनगर बोगद्यांची लांबी वाढणार

इंदिरा नगर बोगदा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील इंदिरानगर, राणेनगर, लेखानगर, दिपालीनगर या भागातील सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी इंदिरानगर आणि राणेनगर येथील बोगद्याची लांबी वाढविण्यात येणार असून, त्यासंदर्भात केंद्राकडे सादर केलेल्या प्रस्तावाला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. या कामासाठी ४७ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. खासदार हेमंत गोडसे गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पासाठी प्रयत्नशील होते.

बोगद्यांची लांबी वाढविण्यामुळे इंदिरानगर व राणेनगर येथील दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी सुमारे १५ मीटरने वाढणार आहे. एक-एक बोगदा ४० मीटर लांबीचा होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली. राणेनगर आणि इंदिरानगर हे दोन्ही बोगदे नाशिक मुंबई महामार्गावर आहेत. सिडको आणि नाशिक शहर यांना जोडणारे हे दोन्ही बोगदे आहेत. बोगद्याचा वरील बाजूस महामार्ग असून, बोगदयांना समांतरही महामार्ग आणि दोन्ही बाजूस सर्व्हिसरोड आहेत. शहराच्या मुख्य दोन उपनगरांना जोडणारे हे बोगदे असल्याने सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. तासन‌्तास बोगदे परिसरातील वाहतुकीच्या कोंडीत वाहने अडकून पडतात. यामुळे वेळेचा अपव्यय होऊन पेट्रोलची मोठी नासाडी होते. परिणामी वाहनधारकांची मोठी कुंचबना होत असते. या जाचातून वाहनधारकांची कायमचीच सुटका करण्यासाठी खा. गोडसे यांचा केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

यासंदर्भातील उपाययोजना करण्याचा प्रस्ताव खा. गोडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून तयार करून घेत प्रस्ताव मजुंरीसाठी केंद्राकडे सादर केला होता. तीन महिन्यांपूर्वी ना. नितीन गडकरी एका कार्यक्रमासाठी इगतपुरी येथे आले असता त्यांनी वरील बोगदयांच्या कामाच्या प्रस्तावाला लवकर मंजुरी मिळणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यांनतर प्रस्तावास प्रत्यक्ष मंजुरी मिळण्याकामी खा. गोडसे यांनी केंद्राकडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर गुरूवारी (दि.३०) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने बोगदयांची लांबी वाढविण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली. प्रस्तावाचा २०२३-२४ च्या एनएच (ओ) यादीत समावेश केला आहे.

बोगद्यावर अप-डाऊनसाठी रॅम्प

आजमितीस दोन्ही ठिकाणच्या बोगद्याची लांबी २५ मीटर इतकी असून, आता प्रत्येक बोगद्याच्या मागील आणि पुढील बाजूस साडेसात ते आठ मीटर बोगद्याची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक बोगद्याची लांबी आता ४० मीटर इतकी होणार आहे. याकामी सुमारे ४७ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. बोगदयाच्या वरील महामार्गावर अप आणि डाऊनसाठी रॅम्प असणार आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : इंदिरानगर, राणेनगर बोगद्यांची लांबी वाढणार appeared first on पुढारी.