नाशिक : इगतपुरीत सोळा धरणे असतानाही नवीन धरण का? शेतकर्‍यांचा सवाल

igatpuri www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील प्रस्तावित अप्पर कडवा धरणाला शेतकर्‍यांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, शासनाकडून दडपशाहीने जमिनीची मोजणी केली जात आहे. शेत जमिनीच्या मोजणीला शेतकर्‍यांचा विरोध असून, आक्रमक भूमिका अन् पवित्रा पाहून भविष्यात अप्पर कडवा धरण विषयाचा संघर्ष अधिक पेटणार असल्याचे संकेत प्रशासनाला दिसून आले आहेत. 2004 पासून अप्पर कडवा धरणाला विरोध होत असताना इतका अट्टहास का केला जातो, असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला.

बळजबरीने जमीन घेतल्यास आम्ही सर्व बाधित शेतकर्‍यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, अशी खंत येथील शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केली. आमच्या शेतीच्या बदल्यात आम्हाला दुसरीकडे शेतीच द्यावी, आम्हाला मोबदला नको आहे. कारण प्रकल्पाला शेती दिली तर आम्ही भूमिहीन होऊ म्हणून अधिकार्‍यांनी लेखी द्यावे. अन्यथा शेतकर्‍यांचे संगोपन करा, तरच मोजणी करा असा इशारादेखील यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी दिला. स्थानिक आमदार या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ, तालुकाध्यक्ष किसन शिंदे, ज्ञानेश्वर डमाळे, अशोक बर्‍हे, बाळू गायकवाड, भाऊराव लगड, युवराज परदेशी, अशोक धोंगडे, बहिरू घोरपडे, भाऊराव घोरपडे, राजाराम घोरपडे, धनाजी घोरपडे, पुनाजी भुतांबरे, चेतन परदेशी, बाळासाहेब गायकवाड, नवनाथ बर्‍हे आदी शेतकरी उपस्थित होते.

665 हेक्टर क्षेत्र होणार बाधित
तालुक्यातील टाकेद खुर्द, घोरपडे वाडी, बाघशिंगवे, आधारवड, घोडेवाडी, ठाकूरवाडी, बारीशिंगवे, भोईरवाडी, वासाळी आणि खेड ही गावे पेसा अंतर्गत असून, त्यामुळे शेतकर्‍यांवर मोठा अन्याय होत आहे. येथील अनेक कुटुंबांचा रोजगार जाऊन उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. जवळपास 665 हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्र बाधित होईल. त्यामुळे आम्हाला शासनाचा मोबदला नको अन् धरणही नकोत, अशी स्पष्ट भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे.

धरणे उशाला, कोरड घशाला
दरम्यान, इगतपुरी तालुक्यात दारणा, भावली, भाम, मुकणे, वैतरणा, कडवा अशी छोटी-मोठी जवळपास 16 धरणे असून, सतराव्या धरणाची गरज काय, इतकी धरणे असूनही आमचा घसा कोरडाच असतो. धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी आमची अवस्था असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी दिल्या.

हेही वाचा:

The post नाशिक : इगतपुरीत सोळा धरणे असतानाही नवीन धरण का? शेतकर्‍यांचा सवाल appeared first on पुढारी.