नाशिक : इगतपुरी एसटी आगाराचा अनागोंदी कारभार

एसटी महामंडळ

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी एसटी आगाराच्या अनागोंदी कारभाराबाबत वाढत्या तक्रारी असून, आगाराने वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

एसटी प्रशासनाने नव्याने फेर्‍यांचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र वेळेवर बसेस न सोडणे, नियोजित बसेस अकस्मात रद्द करणे, उशिरा धावणे, दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे, गरजेच्या मार्गावरील बसफेर्‍या बंद करणे, काही ठराविक मार्गावरच बस सोडणे, एकाच मार्गावर एकापाठोपाठ बस सोडणे आदी प्रकारामुळे इगतपुरी आगाराची वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे दिसत आहे. याशिवाय तालुक्यातील वाहतूक व्यवस्थेवर लक्ष देण्याऐवजी सातत्याने नियोजित फेर्‍या बंद करून बसेस लांब पल्ल्याच्या ठिकाणी पाठवल्या जातात. या काळात तालुक्यातील फेर्‍याचे कोणतेही नियोजन केले जात नाही. दरम्यान, यामुळे प्रवाशांना इच्छा नसूनही नाईलाजाने खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. यात प्रवाशांची लुटही होत आहे. दुसरीकडे अकस्मात बसेस रद्द होत असल्याने शैक्षणिक पास काढूनही विद्यार्थ्यांना नाईलाजाने खासगी वाहतुकीवरही पैसा खर्च करावा लागत आहे. याचा हकनाक फटका पाल्य व पालक यांनाही बसत आहे. नाशिक येथे जाणार्‍या विद्यार्थ्यांना दुपारी 12 वाजेपासून ते संध्याकाळी 7 पर्यंत अत्यंत बेभरोशाच्या बसेसमुळे तासन्तास नाशिक बसस्थानकावर थांबावे लागते. त्यामुळे उपाशी विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक, शैक्षणिक व मानसिक नुकसान होते. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र रोष आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाने खास मानवधन विकासच्या बसेस सोडलेल्या आहेत. मात्र, या बसेस नियमित वेळेवर धावण्याऐवजी उशिराने धावत असल्याच्या तक्रारी आहेत.

वाहक व चालकांचा उर्मटपणा
मुंबई व नाशिकच्या दिशेने धावणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांतील वाहक व चालकांच्या उर्मटपणामुळे घोटी येथील पासधारक विद्यार्थ्यांना बस रिकामी असली तरी बसमध्ये घेतले जात नसल्याची तक्रार आहे. जाब विचारल्यास अत्यंत अपमानास्पद वागणूक व उत्तर देतात. त्यामुळे बस रिकामी जाते. परंतु महामंडळाकडे पैसे भरून तासन्तास विद्यार्थी नाशिक बसस्थानकात भर उन्हात अथवा पावसात उभे असतात. याची वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : इगतपुरी एसटी आगाराचा अनागोंदी कारभार appeared first on पुढारी.