नाशिक : ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’साठी सर्वतोपरी प्रयत्न; विभागीय आयुक्त गमे : ‘नाशिक 2.0’ सल्लागार समितीची बैठक

www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ या अंतर्गत उद्योग उभारणीसाठी आवश्यक सर्व माहिती एकत्रित करून पोर्टल तयार करणे, तसेच सिंगल विंडो सिस्टिम तयार करणे, नाशिक विमानतळाचे ब्रॅण्डिंग उत्तर महाराष्ट्राचे विमानतळ असे करावे, जेणेकरून अधिक प्रवासी येऊन विमानसेवा नियमित होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

‘मी नाशिककर’ या अराजकीय चळवळीच्या नाशिक 2.0 च्या सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली ईएसडीएस येथे नुकतीच पार पडली. मी नाशिककर ही चळवळ इंडस्ट्री, आयटी व ट्रेड या त्रिसूत्रीवर काम करीत असून, नाशिकमध्ये मोठे उद्योग यावेत तसेच इन्फ्रास्ट्रक्चर, दळणवळण, कृषी प्रक्रिया उद्योग, वाइनरी, मेडिकल टुरिझम यावर काम करीत आहे. दरम्यान, बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने वैतरणा धरणाचे अतिरिक्त 25 टीएमसी पाणी मुकणे धरणात वळवणे, जेणेकरून उद्योगांसाठी राखीव साठा होऊ शकेल. नार पारचे अतिरिक्त पाणी गोदावरी खोर्‍यात वळवणे, मुंडेगाव येथील प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पास गती देणे, जेणेकरून कृषी निर्यातीसाठी मदत होईल. आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठाचा पाठपुरावा करणे, राजूरबहुला येथील प्रस्तावित प्रकल्पामध्ये 20 टक्के जागा आयटी पार्कसाठी राखीव ठेवणे, सध्या 40 लाख स्क्वेअर फूट जागेची मागणी विविध सॉफ्टवेअर कंपन्यांनी नोंदवली आहे. विविध संस्थांसोबत नाशिकच्या हितासाठी विचार करणारा दबाव गट तयार करणे, शासकीय जागेची उपलब्धता आदी विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी उद्योजक अशोक कटारिया, अनंत राजेगावकर, किरण चव्हाण, उमेश वानखेडे, पीयूष सोमाणी, विलास शिंदे, डॉ. राज नगरकर, सुधीर मुतालिक, मनीष रावल, संजय पैठणकर, संतोष मंडलेचा, आर्कि. विवेक जायखेडकर, आर्कि. धनंजय शिंदे, संजय कोठेकर आदी उपस्थित होते.

कृषी प्रक्रिया उद्योग धोरणासाठी पाठपुरावा करणार
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाची मान्यता मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींना विनंती करणे, नाशिकबाहेरील रिंग रोड हा 30 मीटरऐवजी 60 मीटर करणे, कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी नाशिकला केंद्रस्थानी ठेवून शासकीय स्तरावर एक धोरण तयार करण्यासाठी पाठपुरावा करणे, सध्या राज्यात फक्त ऊस या पिकासाठी असे धोरण आहे. तसेच धोरण अन्य फळांसाठीदेखील असावे. नाशिक व्हॅलीसाठी प्रयत्न करणे, यामध्ये इको वेलनेस, मेडिटेशन, पर्यावरण, वाइनरी, अ‍ॅडव्हेंचर, धार्मिक अशा विविध टुरिझमसाठी प्रयत्न करणे आदी विषयांवर चर्चा झाली.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’साठी सर्वतोपरी प्रयत्न; विभागीय आयुक्त गमे : ‘नाशिक 2.0’ सल्लागार समितीची बैठक appeared first on पुढारी.