नाशिक : इज ऑफ लिव्हिंग इंडेक्सच्या सर्वेक्षणाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात

live index www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे मागील दोन वर्षांपासून घेतल्या जात असलेल्या ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ सर्वेक्षणाच्या तिसऱ्या पर्वास दि. १ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.

भारतामधील सर्व प्रमुख शहरांमध्ये त्या त्या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाचे इतर प्रमुख विभाग पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतात. यासाठी शासन वेळोवेळी विविध योजनांच्या माध्यमातून या सुविधा उत्तमाेत्तम देण्याचे प्रयत्न करत असते. सर्व सेवासुविधा आणि शहरातील नोकरी, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, शहरातील हवामान या प्रमुख बाबींवर त्या-त्या शहरातील राहणीमानाचा दर्जा अवलंबून असतो.

या सर्व सेवासुविधांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यामध्ये सुधार करण्याकरता शासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि सर्व इतर शासनाच्या विभागांकडून अर्बन आउटकम फ्रेमवर्कच्या माध्यमातून प्रश्नावलीच्या स्वरूपात माहिती गोळा करत असते. यावर्षीसुद्धा १५ ऑक्टोबरपर्यंत ही सर्व माहिती केंद्र शासनाकडे सादर करण्यात आलेली आहे. याच प्रक्रियेचा प्रमुख भाग असलेल्या नागरिकांची मते जाणून घेण्याचा टप्पा म्हणजेच सिटीझन पर्सेप्शन सर्व्हेच्या माध्यमातून म्हणजेच “इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स” सर्वेक्षणास १ नोव्हेंबरला सुरुवात होत आहे.

नागरिकांची मते आणि स्मार्ट सिटी कार्यालयांनी नोडल एजन्सी म्हणून सर्व विभागांची दिलेली माहिती यांच्या एकत्रित मूल्यांकनानुसार शहराचा इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स ठरणार आहे. सर्वेक्षणाद्वारे शहरांमध्ये असलेल्या सुविधा पुरेशा आहे किंवा कसे, नागरिकांचे सुविधांप्रती मत याद्वारे भविष्यातील योजना आणि कार्यपद्धती ठरविण्यास मदत होणार आहे. २०१८ मध्ये नाशिक शहराला २१, तर २०२० मध्ये ३८ क्रमांक मिळाला होता.

नाशिक शहरासाठी ८०२७७६ कोड

इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण दि. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी https://eol2022.org /citizenfeedback या वेबसाइटला भेट देऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. आपल्या नाशिक शहरासाठी ८०२७७६ हा स्थानिक स्वराज्य संस्था (यूएलबी) कोड देण्यात आलेला आहे. लिंक ओपन केल्यावर नाव, मोबाइल नंबर आणि माहिती भरल्यानंतर रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, वाहतूक, बँक, सार्वजनिक वाहतूक, शहरातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे, अशा साध्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : इज ऑफ लिव्हिंग इंडेक्सच्या सर्वेक्षणाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात appeared first on पुढारी.