Site icon

नाशिक : इथेनॉल प्रकल्प याच हंगामात; कादवाचे बॉयलर अग्निप्रदीपन

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
यंदा ऊसतोडीचे योग्य नियोजन करण्यात आले असून, सुमारे पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कादवाने ठेवले आहे. तसेच याच हंगामात इथेनॉल प्रकल्प सुरू केले जाणार असल्याने यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी कारखान्याच्या 46 व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळी केले.

बॉयलर अग्निप्रदीपन पूजन सूर्यकांत राजे, योगेश बर्डे, प्रकाश पिंगळ, समाधान गडकरी, संजय जाधव या दाम्पत्यांच्या हस्ते झाले. श्रीराम शेटे म्हणाले की, साखर उद्योग अनेक अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. कादवाचा इथेनॉल प्रकल्प या हंगामात कार्यान्वित होत असून, त्याचा निश्चित शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. त्यासाठी सभासदांनी ठेवी ठेवल्याबद्दल आभार मानत अजूनही ठेवी ठेवाव्यात, असे आवाहन केले. सीएनजी प्रकल्प विचाराधीन असून, संपूर्ण अभ्यासाअंती हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. ऊस हे शाश्वत पीक असून, सर्व शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊसलागवड करावी, असे आवाहन शेटे यांनी केले. तसेच कादाचे नवीन प्रकल्प शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी कामगारांच्या आरोग्य तपासणी चाचणी अहवालाचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्वासराव देशमुख, जयराम डोखळे, विठ्ठलराव संधान, राज्य बँक अधिकारी माधव पाटील, युनियन अध्यक्ष भगवान जाधव यांनी विचार मांडले. यावेळी दिंडोरीचे माजी सभापती सदाशिव शेळके, दत्तात्रेय जाधव, बाकेराव जाधव, बाजीराव पाटील, साहेबराव पाटील, डॉ. योगेश गोसावी आदींसह सर्व संचालक सभासद कामगार उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post नाशिक : इथेनॉल प्रकल्प याच हंगामात; कादवाचे बॉयलर अग्निप्रदीपन appeared first on पुढारी.

Exit mobile version