नाशिक : इस्कॉन मंदिरात गोपाष्टमी, गोवर्धन पूजेचा उत्साह

इस्कॉन मंदिर- www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) नाशिकच्या वतीने बुधवारी, दि.2 गोपाष्टमी महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ५ वाजता मंगल आरतीपासून महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर “हरे कृष्ण महामंत्रा जप, दर्शन आरती, श्रीमद्भागवत” प्रवचनाचा भाविकांनी लाभ घेतला.

सायंकाळी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभूंचे प्रवचन झाले. यावेळी ते म्हणाले, वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत गोपाळकृष्ण गोवत्साचे पालन करत असे. गोपाळकृष्णाच्या वयाच्या सहाव्या वर्षी नंद महाराज व इतर वरिष्ठ गोपींनी कृष्णाला आता गोचरण करण्याची जबाबदारी देण्यात यावी असा निर्णय घेतला. गोचरण करण्यासाठी मुहूर्त बघण्यात आला व तो दिवस होता कार्तिक शुक्ल अष्टमीचा. त्या दिवशी माता यशोदेने कृष्णाला सजवले व जेव्हा पायात चपला घालण्यासाठी दिल्या. तेव्हा कृष्ण मातेला म्हणाले की, “जर तू सर्व गायींना चपला देणार असशील तरच मी चपला घालेन, नाहीतर मी देखील घालणार नाही.” कृष्ण अनवाणीच गोचरणासाठी गेले. हे होते कृष्णाचे गायीवरील प्रेम. परंतु गायी देखील कृष्णावर तितकेच प्रेम करीत. सर्व गायींनी खुरांनी वृन्दावनातील माती तुडवून मऊ केली. जेणेकरून कृष्णाच्या चरणांना इजा होणार नाही. कार्तिक महिन्यात वृंदावनाचे व तेथे झालेल्या कृष्ण लिलांचे स्मरण केल्याने सकारात्मक विचार येतात. गोपाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाने गायींवरील प्रेम व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने गोसेवेचे व्रत या दिवशी करायला हवे. संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा दिला जातो व तिच्या सेवेसाठी आपण सज्ज व्हावे, असे ते म्हणाले. गोपाष्टमीनिमित्त विग्रहांची सुंदर सजावट करण्यात आली. राधारणी, ललिता सखी व विशाखा सखी यांनी गोपवेष परिधान केला. आलेल्या सर्व भाविकांनी दामोदर अष्टकं गात राधा दामोदर यांना दिवा अर्पण करून पूजा केली, गोवर्धन शिळेची परिक्रमा केली. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलस.

हेही वाचा:

The post नाशिक : इस्कॉन मंदिरात गोपाष्टमी, गोवर्धन पूजेचा उत्साह appeared first on पुढारी.