नाशिक : ई- बसेससाठी आडगावला उभारणार स्वतंत्र डेपो

नाशिक ई बस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेने ५० इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला असून, या बसेसच्या संचलनासाठी स्वतंत्र ऑपरेटर नियुक्तीसाठी पुढील महिन्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याचबरोबर आडगाव येथील ट्रक टर्मिनसलगतच्या दोन एकर जागेत ई-बसेसकरिता स्वतंत्र डेपो, चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन-कॅप) अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून दोन टप्प्यात या बसेस खरेदी केल्या जाणार आहेत.

शहराअंतर्गत वाहतुकीसाठी महापालिकेने ८ जुलै २०२१ पासून नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या ‘सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक’च्या माध्यमातून शहर बससेवेला टप्प्याटप्प्याने प्रारंभ केला. सद्यस्थितीत शहरात २०० सीएनजी, तर ५० डिझेल अशा एकूण २५० बसेस विविध मार्गांवर चालविल्या जात आहेत. महापालिका हद्दीसह लगतच्या २० किलोमीटर लांबीच्या ग्रामीण भागातही महापालिकेतर्फे बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बससेवा पर्यावरणपूरक व्हावी, या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सिटीलिंकच्या ताफ्यात ५० इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी केंद्राच्या फेम-२ योजनेंतर्गत शासनाला प्रस्तावदेखील सादर करण्यात आला होता. परंतु त्यात यश मिळू न शकल्याने महापालिकेला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दीड वर्षाची प्रतीक्षा करावी लागली.

आता केंद्राच्याच एन-कॅप योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बसेस खरेदीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी २५ बसेस खरेदीकरिता प्रतिबस ५५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान प्राप्त होऊ शकणार आहे. महापालिका दोन टप्प्यांत ५० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणार आहे. सीएनजी व डिझेल बसेसच्या संचलनासाठी महापालिकेने सध्या दोन ऑपरेटर्स नियुक्त केले आहेत. इलेक्ट्रिक बसेसच्या संचलनासाठी स्वतंत्र ऑपरेटर्सची नियुक्ती केली जाणार आहे. यासंदर्भात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पुढील महिन्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. या इलेक्ट्रिक बसेसकरिता नव्याने उभारण्यात आलेल्या तपोवन डेपोत व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र आडगाव ट्रक टर्मिनसलगच्या दोन एकर जागेत ई-बसेसकरिता स्वतंत्र डेपो व चार्जिंग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके यांनी दिली.

तोटा होणार कमी

सिटीलिंकच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या बसेसकरिता प्रतिकिलोमीटर ७५ रुपयांचा खर्च होत आहे. तर, तिकीट विक्रीतून ४५ रुपये प्रतिकिलोमीटर महसूल मिळत असल्याने प्रतिकिलोमीटर ३० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. इलेक्ट्रिक बसेसची खरेदी आॅपरेटर्सच्या माध्यमातूनच केली जाणार आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान आॅपरेटर्सला उपलब्ध करून दिले जाईल. त्याबदल्यात इलेक्ट्रिक बसेसच्या संचलनाकरिता प्रतिकिलोमीटर दरात सवलत मनपाला मिळू शकले. याद्वारे बसेसचा खर्च प्रतिकिलोमीटर ६० रुपयांपर्यंत आणून सिटीलिंकचा तोटा कमी करण्याची प्रशासनाची योजना आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ई- बसेससाठी आडगावला उभारणार स्वतंत्र डेपो appeared first on पुढारी.