नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल या प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम करण्याबाबत ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न केल्याप्रकरणी मनपाच्या बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला एकूण प्रकल्पाच्या 10 टक्के दंडात्मक कारवाईबाबतची नोटीस पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, आयआयटी पवईने संबंधित उड्डाणपुलाची गरज नसल्याचा अहवाल दिला आहे, असे असताना मनपाकडून उड्डाणपुलाचे काम करण्यासाठीचा आग्रह अनाकलनीय आहे.

मनपाने मायको सर्कल व त्रिमूर्ती चौक येथे सुमारे 250 कोटींचा उड्डाणपूल प्रस्तावित केला होता. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत असतानाच हे दोन्ही उड्डाणपूल अनेक मुद्द्यांबाबत वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. विशिष्ट ठेकेदाराला समोर ठेवून निविदा प्रक्रिया बनविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच 44 कोटींची वाढ, स्टाररेट वाढविणे, वाहतूक सर्वेक्षण न करताच उड्डाणपूल उभारण्याचा प्रयत्न, वृक्षतोड अशा अनेक मुद्द्यांमुळे उड्डाणपूल चर्चेत राहिला. अनेकांनी न्यायालयात जाऊन दावा दाखल करत या प्रकरणाची चौकशी करण्याबरोबरच कामे रद्द करण्याची मागणी केली आहे. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी मायको सर्कल येथील उड्डाणपूल रद्द केला. तर सिडकोतील उड्डाणपुलाची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी आयआयटी पवईला ट्रॅफिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. गेल्या जुलैमध्ये आयआयटी पवईने संबंधित ठिकाणी उड्डाणपुलाची गरज नसल्याचा अहवाल दिला होता. परंतु, त्यानंतरही बांधकाम विभागाने पीबीए इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीला त्रिमूर्ती चौक येथील उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी आग्रह धरला असून, ठेकेदार मात्र काम करण्यास उत्सुक नाही. यामुळे आता बांधकाम विभाग ठेकेदाराला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावणार असल्याचे समजते.

हेही वाचा:

The post नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस appeared first on पुढारी.