नाशिक : उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवण्याची सत्कार्य फाउंडेशनची मागणी

जिम www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
कचरा टाकणारे, साहित्यांची चोरी करणारे यासह मद्यपी व टवाळखोरांवर कारवाई करता यावी, महापालिकेच्या मालमत्तेचे, नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी उद्याने आणि जॉगिंग ट्रॅकवर स्मार्ट सिटीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

गोविंदनगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसरातील अनेक उद्याने आणि जॉगिंग ट्रॅक हे टवाळखोर आणि मद्यपींचे अड्डे झाले आहेत. तेथे झाडपाला व इतर कचरा टाकला जातो, यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य असते. महिला-पुरुषांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याच्या घटनाही घडतात. संरक्षक जाळ्या, ग्रीन जिमचे साहित्य यांचीही चोरी होते. या सर्व गैरप्रकारांना आळा बसावा, संबंधितांवर कारवाई करता यावी, नागरिकांचे रक्षण व्हावे, यासाठी स्मार्ट सिटीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे निवेदन शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने देण्यात आले. शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, विठ्ठल देवरे, सखाराम देवरे, आर. आर. जाधव, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवण्याची सत्कार्य फाउंडेशनची मागणी appeared first on पुढारी.