Site icon

नाशिक : उद्योगांसाठी ”स्वच्छ तंत्रज्ञानाचे पर्याय”; संयुक्त चर्चासत्र

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी टेरी, मेरी, औद्योगिक संस्था आणि सर्व स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेबरोबर हातात हात घालून काम करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नाशिक महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. 

स्वीस एजन्सी, आयमा, मनपा आणि टेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयमाच्या अंबड येथील के. आर. बूब सभागृहात उद्योगांसाठी ”स्वच्छ तंत्रज्ञानाचे पर्याय” या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, नवी दिल्ली येथील विकास व सहकार्याबाबतच्या स्वीस एजन्सीचे प्रमुख डॉ. जोनाथन डेमंग, कार्यक्रम अधिकारी आंद्रे मुलर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे, टेरीच्या पर्यावरण केंद्राचे अधिकारी डॉ. अरिंदम दत्ता, महिंद्रा अँड महिंद्राचे उपमहाव्यवस्थापक धनंजय जोशी, ब्रेम्बो ब्रेक इंडियाचे राकेश मुसळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे पर्यावरण अधिकारी चेतनकुमार सांगोळे, आयमाचे सरचिटणीस ललित बूब आदी होते. ग्लोबल वाॅर्मिंगचा धोका वेळीच ओळखून त्याला सर्व जण सामोरे जात आहेत आणि उद्योजकही त्यावर उपाय शोधत आहेत ही बाब निश्चितच स्तुत्य आहे, असे जोनाथन डेमंग आणि कार्यक्रम अधिकारी आंद्रे मुलर यांनी भाषणात सांगितले. अमर दुर्गुळे यांनीही प्रदूषण रोखण्यास त्यांच्या खात्यातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. राकेश मुसळे आणि डॉ. अरिंदम दत्ता यांनी सुयोग्य कामकाज परिस्थिती, पोषक वातावरण आणि पर्यावरणपूरक उत्पादकता याबाबत चित्रफितीद्वारे माहिती दिली. धनंजय जोशी यांनी माहिंद्राच्या प्रकल्पात राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक बाबींची माहिती विशद केली. आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी आयमाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली. चेतनकुमार सांगोळे यांनी सूत्रसंचालन केले, तर ललित बूब यांनी आभार मानले. चर्चासत्रास अशोक ब्राह्मणकर, राधाकृष्ण नाईकवाडे यांच्यासह 100 हून अधिक उद्योजक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : उद्योगांसाठी ''स्वच्छ तंत्रज्ञानाचे पर्याय''; संयुक्त चर्चासत्र appeared first on पुढारी.

Exit mobile version