नाशिक : उन्हाचा वाढला तडाखा; टँकरसाठी प्रशासनाचे नियोजन सुरू

टँकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसह येत्या काळात ग्रामीण भागातून टँकरची मागणी होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्यासाठी टँकरचे नियोजन सुरू केल्याचे समजते आहे.

चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला. तर मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा ऊन तापायला सुरुवात झाली असून, किमान पारा 32 अंशांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यासोबतच ग्रामीण भागात काही ठिकाणी पाण्याचे स्रोत आटू लागल्याने येत्या काही दिवसांमध्ये तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यावेळी ग्रामीण जनतेची सारी भिस्त ही टँकरवरच अवलंबून असणार आहे. हीच बाब लक्षात घेत प्रशासनाने टँकरचे नियोजन सुरू केले आहे. ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांमधून टँकरची मागणी झाल्यानंतर तातडीने संबंधित ठिकाणी टँकर सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. याशिवाय गावांसाठी तसेच टँकरकरिता विहीर अधिग्रहण केल्या जाणार आहे. त्यासाठी विहिरींच्या स्थळ निश्चितीवर भर दिला जात असल्याची माहिती मिळते आहे.

साडेसहा कोटींचा आराखडा
जिल्ह्यातील टंचाई निवारणासाठी यंदा सहा कोटी 55 लाख 20 हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये संभाव्य टँकरची संख्या 110 धरण्यात आली असून, त्याकरिता तीन कोटी 49 लाख रुपये प्रस्तावित आहे. उर्वरित निधीत नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती व अन्य उपाययोजनांचा समावेश आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : उन्हाचा वाढला तडाखा; टँकरसाठी प्रशासनाचे नियोजन सुरू appeared first on पुढारी.