नाशिक : उपनगरांमध्ये पाण्याची दाहकता, टँकरच्या फेऱ्या वाढल्या

पिण्याचे पाणी टॅंकर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल इतक्या पिण्याचे पाण्याचे महापालिका प्रशासनाकडून नियोजन केले जात असतानाच उपनगरवासीयांना गेल्या फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. विशेषत: नाशिकरोड, सातपूर या भागात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने, येथे टँकरच्या फेऱ्या दिवसागणिक वाढत आहेत. गेल्या चार महिन्यांच्या आकडेवारीचा विचार केल्यास शहरात २,८१५ टँकरच्या फेऱ्या झाल्याचे समोर आले आहे. एप्रिलच्या मध्यावधीपर्यंत ही स्थिती असून, मे, जून आणि जुलैमध्ये याची आणखी दाहकता वाढण्याची शक्यता आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे महापालिकेकडून अद्यापपर्यंत उपनगरांमध्ये जलवाहिन्या पोहोचविल्या नाहीत. परिणामी या भागातील नागरिकांना पाण्याची झळ सोसावी लागत आहे. परिणामी महापालिकेच्या सहाही विभागांत टँकरची मागणी असून, त्यामध्ये नाशिकरोड आणि सातपूर आघाडीवर आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नाशिकरोड, पंचवटी, नाशिक-पूर्व, नाशिक-पश्चिम, सातपूर, सिडको या सहाही विभागांत प्रत्येकी एक या प्रमाणे सहा टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पंचवटीत अतिरिक्त एक अशा दोन टँकरची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. याकरिता ३० लाखांची तरतूदही करण्यात आली आहे.

‘अल निनो’ वादळामुळे यंदा मान्सून पुढे ढकलला जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने, महापालिकेकडून सध्या पाणीकपातीचे नियोजन केले जात आहे. सुरुवातीला एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारपासून हे नियोजन केले जाणार होते. मात्र, पाणीकपातीच्या निर्णयाला विरोधाचा सूर आवळला गेल्याने, हा निर्णय कोण घेणार, अशी टोलवाटोलवी प्रशासनात सुरू आहे. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी उपनगरांमध्ये पाण्याचे आतापासून दुर्भिक्ष असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सध्या शहरातील बहुतांश भागामध्ये जलवाहिन्या दुरुस्तीचे कामे सुरू असून, अमृत योजनेद्वारे जलवाहिन्यांची कामे केली जाणार आहेत. ही कामे उपनगरांमध्ये होणार असल्याने, पुढच्या काही महिन्यात या भागातील रहिवाशांच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. मात्र, या उन्हाळ्यात या भागातील रहिवाशांना पाण्यासाठी चांगलीच वणवण करावी लागण्याची शक्यता आहे. सध्या या भागातील नागरिकांना टँकरचा आधार असून, नागरिकांकडून टँकरची मागणी वाढतच आहे. अशात पुढच्या काळात महापालिकेला टँकरची संख्या वाढविण्याची गरज पडू शकते.

जानेवारी – ५५०

फेब्रुवारी – ६७१

मार्च – ८८६

एप्रिल – ७०८

एकूण- २,८१५

(आकडेवारी २४ एप्रिल २०२३ पर्यंतची आहे)

नाशिकरोड, सातपूरमध्ये सर्वाधिक

गेल्या चार महिन्यांत नाशिकरोडला १८ एप्रिलपर्यंत सर्वाधिक ८४३ टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. त्या पाठोपाठ सातपूरमध्ये २४ एप्रिलपर्यंत ५०० टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. तसेच नाशिक पूर्वमध्ये ४५८ तर नवीन नाशिकमध्ये ३६१ टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत.

सहाही विभागांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वाढत्या शहरामुळे पाण्याची गरज निर्माण होत आहे. याशिवाय उपनगरांमध्ये जलवाहिन्या पोहोचल्या नसल्याने तेथील नागरिकांकडून टँकरची मागणी होत आहे. सहाही विभागांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

– शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

हेही वाचा : 

The post नाशिक : उपनगरांमध्ये पाण्याची दाहकता, टँकरच्या फेऱ्या वाढल्या appeared first on पुढारी.