नाशिक : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ‘मायेची ऊब’ 

मायेची उब,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या ऊसतोडणी हंगाम जोरदार सुरू असून, कामगार आपल्या लहानग्यांसह गाव सोडून शेतामध्ये वास्तव्यास आहेत. एकीकडे थंडी तर दुसरीकडे पोटाची भ्रांत असलेल्या या कामगारांच्या मुलांनाही या सर्व परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशात नेचर क्लब ऑफ नाशिक आणि ॲड. आर. बी. बोहोरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या मुलांसाठी ‘मायेची ऊब’ हा उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत शंभर ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे. ही मोहीम महिनाभर चालविली जाणार आहे. या मुलांसाठी साखरशाळा म्हणजे ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी ऊसतोडणी होणाऱ्या भागात चालवल्या जाणाऱ्या हंगामी शाळा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर निवेदन देऊन मागणी केली जाणार आहे. आपल्या गावात असताना शाळेत जाणारी ही मुले ऊस हंगामापुरती स्थलांतरित झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. ऊसतोड कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे यासाठीदेखील प्रयत्न केले जाणार आहेत.

मायेची ऊब या उपक्रमात अ‍ॅड. आर. बी. बोहोरा यांच्या मार्गदर्शनाखाली नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, पक्षिमित्र चंद्रकांत दुसाने, उमेशकुमार नागरे, आशिष बनकर, दर्शन घुगे, सागर बनकर, नितेश पिंगळे, अपूर्व नेरकर, ओमकार भावनाथ आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post नाशिक : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 'मायेची ऊब'  appeared first on पुढारी.