नाशिक : एकादशीनिमित्त हरिहर भेटीची अनुभूती

एकादशी www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

रामकुंडावर अंघोळ करून राममंदिरातून तुळस घेऊन पायी निघालेले वारकरी रामवारीच्या निमित्ताने मंगळवारी श्रावण वैद्य एकादशीस त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तिनाथांचे दर्शन घेत कृतार्थभावाने परतले. दिवसभरात सुमारे 60 हजार वारकरी रामवारीस आल्याने त्र्यंबक रस्त्यावर पदोपदी भक्तिभावाचा सुगंध दरवळत होता.

पहाटेपासून सायंकाळी पाचपर्यंत नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर वारकरी भक्तांची रीघ लागली होती. भजन अन् टाळ-मृदंगांच्या आवाजाने संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण झाले होते. वै. आचार्य जगन्नाथ महाराज पवार यांनी 30 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या रामवारीस आता विशाल स्वरूप आले आहे. नाशिक जिल्ह्यातील गावोगावची वारकरी भक्त या रामवारीत सहभागी होतात. महिलांची तसेच युवावर्गाची संख्या लक्षणीय असून, दरवर्षी त्यात वाढ होत आहे. नाशिक-त्र्यंबक हे 30 किमीपेक्षा जास्त अंतर पायी चालून आल्यानंतर उत्साहाने त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर अभंगसेवा सादर करतात. नंतर कुशावर्तावर जाऊन गोदामायीला वंदन करत श्रीकृष्ण मंदिरातील दर्शनानंतर संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात होते. दुपारी वारकऱ्यांचे श्री निवृत्तिनाथ महाराज समाधि मंदिरात आगमन झाले. यावेळी निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानचे प्रशासक ॲड. भाऊसाहेब गंभिरे, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे व नगरपालिका मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिंड्यांचे स्वागत केले. निवृत्तिनाथ महाराज मंदिर परिसरात रंगनाथ खाडे महाराज यांनी प्रवचन, तर दामोदर महाराज गावले यांनी कीर्तन सेवा केली. तसेच श्री विठ्ठल सेवा मंडळ यांच्या स्वयंसेवकांनी सेवा सादर केली. भरपावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम होता. रात्री उशिरापर्यंत संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर परिसरात वारकरी भाविकांची गर्दी होती.

हेही वाचा:

The post नाशिक : एकादशीनिमित्त हरिहर भेटीची अनुभूती appeared first on पुढारी.