नाशिक : एचआयव्ही बाधितांचे जुळले सूर, सात जोडपे विवाहबंधनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

समाजाच्या दृष्टीने एड्स हा एक बदनाम आजार आहे. असुरक्षित लैंगिक संबंधातून एड्सची बाधा होत असल्याने त्यावर भाष्य करणे टाळले जाते. त्यामुळे साहजिकच एड्सबाधित रुग्णांना समाजात दुय्यम वागणूक मिळते. परंतु काही सामाजिक संस्था एड्सबाधितांना सामान्य माणसासारखे जीवन जगता यावे यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.

असाच एक स्तुत्य उपक्रम नुकताच नाशिक नेटवर्क, प्रेम फाउंडेशन, जिव्हाळा संस्था, तुळसाई संस्था, सेवा दल यांच्या वतीने घेण्यात आला. ऋणानुबंध म्हणजेच एड्सबाधितांचा वधू-वर परिचय मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात सात जोडप्यांचे विवाह जुळून आले. यंदाचा हा आठवा मेळावा होता. या मेळाव्यात राज्यभरातून एचआयव्हीबाधित जीवन जगणाऱ्या इच्छुक तरुणांनी सहभाग नोंदवला. यामध्ये त्यांना विवाहापूर्वी व नंतर समुपदेशन, नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी, लक्षणे, वैद्यकीय सल्ला याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

नाशिक शहरात जवळपास नऊ हजार एचआयव्हीबाधित रुग्ण आहेत. ज्या बाधितांनी उपचार घेणे सोडून दिले आहे, त्यांचा पाठपुरावा घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. समाजात जीवन कसे जगले पाहिजे, इतरांना बाधा होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल संस्था मार्गदर्शन करत असते. एचआयव्ही बाधिताने व्यवस्थित उपचार घेतले तर २५ वर्षांचा तरुण असेल तर तो ७० वर्षापर्यंत आयुष्य जगू शकतो. ग्रामीण भागातील लोक सुरुवातीला उपचार घेतात नंतर सोडून देतात, अशा व्यक्तींना समजावून सांगणे थोडे अवघड असते. त्यामुळे संस्थेला सतत अशा व्यक्तींचा पाठपुरावा करावा लागतो. नाेकरीवरून काढून टाकणे, शिक्षण न मिळणे, उपचार न मिळणाऱ्यांसाठी संस्था काम करत असते. या लोकांना सामाजिक मानसिक आधाराची गरज असते. कुटुंबात एक व्यक्ती पॉझिटिव्ह असली तरी त्या कुटुंबात विवाहाला अनेक अडचणी येतात. परंतु एचआयव्ही बांधितांचे मूले निगेटिव्ह होऊ शकते. फक्त त्यासाठी योग्य उपचाराची गरज असते. त्यासाठी एचआयव्ही बाधितांचा ‘ऋणानुबंध’ वधू-वर मेळावा संस्था आयोजित करत असते.

आमची संस्था १४ वर्षांपासून एड्सबाधित रुग्णांवर काम करत आहे. त्यांचे समुपदेशन करणे, आजाराबद्दल माहिती देणे, सकारात्मक जीवन कसे जगले पाहिजे, वर्तन कसे असले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले जाते. नोकरीवरून काढून टाकल्यास, शिक्षण, उपचार न मिळाल्यास त्यांचे काय अधिकार आहेत ही सर्व कामे आमच्या संस्थेच्या वतीने केली जातात.

– महेंद्र मुळे, नाशिक नेटवर्क संस्थेचे अध्यक्ष

मी शेतकरी आहे. कधी वाटले नव्हते माझे लग्न होईल माझा संसार असेल, पण मी नेहमी सकारात्मक विचार केला. संस्थेच्या मदतीने औषधोपचार मिळाले, वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले. ४३ व्या वर्षी माझे लग्न झाले. पत्नीदेखील एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, पण आज आम्हाला सात वर्षाचा मुलगा आहे आणि तो पूर्णपणे निगेटिव्ह आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असून, मी ग्रामपंचायत समितीचा सदस्यदेखील आहे.

– अशोक (नाव बदललेले)

हेही वाचा :

The post नाशिक : एचआयव्ही बाधितांचे जुळले सूर, सात जोडपे विवाहबंधनात appeared first on पुढारी.