नाशिक : एमआयडीसीत खांदेपालट; नवे प्रादेशिक अधिकारीपदी उदय किसवे

नाशिक एमआयडीसी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अधिकार्‍यांच्या बदल्यांच्या सपाटा सुरू झाला असून, आता महामंडळांतही खांदेपालट करण्यात आले आहे. राज्यातील तब्बल नऊ एमआयडीसी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनाही कार्यमुक्तीचे आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर येत असून, त्यांच्या जागी उदय किसवे हे नवे प्रादेशिक अधिकारी असतील, अशी चर्चा आहे.

बदल्या करण्यात आलेल्या नऊही अधिकार्‍यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारमधील माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. मात्र, शिंदे सरकार येताच, या अधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. वास्तविक, या बदल्यांची अधिकृत ऑर्डर अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, नवीन नियुक्तीमध्ये नाशिक एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदी उदय किसवे यांची नियुक्ती करण्यात आली असून, नितीन गवळी यांना कार्यमुक्तीचे आदेश प्राप्त झाले आहेत. तसेच गवळी यांची सेवा मूळ महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. उदय किसवे, नाशिक हे सध्या अहमदनगर येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) या पदावर कार्यरत असून, यापूर्वी नाशिक जिल्ह्यात त्यांनी विविध पदांवर काम केलेले आहे. त्यामध्ये निफाड, चांदवड व नाशिक प्रांत, भूसंपादन अधिकारी तसेच कुंभमेळा कक्षात कुंभमेळा अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कार्यकाळात भूसंपादनाला वेग देण्यात आला होता. आता नाशिकसाठी ते कोणते प्रकल्प आणतील याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : एमआयडीसीत खांदेपालट; नवे प्रादेशिक अधिकारीपदी उदय किसवे appeared first on पुढारी.