नाशिक : ‘ऐक शेतकरी राजा रं… जीव लाखमोलाचा हाय रं..!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याची साद घातली होती. याला प्रतिसाद देण्यासाठी संगीतकार गायक संजय गिते यांनी आत्महत्या प्रतिबंधक दिनाचे औचित्य साधून सुरगाणा तालुकातील शिंदे दिगर या केम डोंगराजवळ गिरणा नदीच्या उगमाजवळील दुर्गम भागातील छोट्या गावामध्ये गिते यांनी ‘शेतकरी जिंदाबाद… जिंदगी जिंदाबाद’ हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे.

संगीतमय कार्यक्रमांमध्ये ‘ट्रॅक्टर चालतं डिझेलवरी, बुलेट चालते पेट्रोलवरी, आपल्या जिवाचं इंजन चालतं श्वासावरी’, ‘मी हृदयाचा आभारी आहे, मी डोळ्यांचा आभारी आहे’, ‘ऐक शेतकरी राजा रं, जीव लाखमोलाचा हाय रं, शेतकरी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद’ अशी गाणी सादर करीत शेतकऱ्यांचे मनोबल वाढविले. शेतकरी मजूर, कष्टकऱ्यांच्या काळजाला थेट हात घालण्याचे काम गितेंच्या सुरांनी केले. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांसह महिला व युवकांना आत्मविश्वासाने जगण्याची एक नवी दृष्टी मिळाली. यावेळी लेखक विजय निपाणेकर, ग्रामसेवक चौधरी, पोपट पवार, योगेश पवार, काळू गाढवे, वंदना गावित, मनाजी गावित, चिमाबाई पवार, चंद्रकला गावित, रामदास गांगुर्डे, भीमाबाई जोपळे, मधुकर गवळी, लक्ष्मण भोये, सोनी पवार, अंजना भोये, शीतल पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, गायक गिते हे गेली अनेक वर्षे हा उपक्रम गावोगावी विनामूल्य पद्धतीने राबवित आहेत. या गाण्यांमुळे सकारात्मक शक्तीमध्ये वाढ झाल्याचे गामस्थांनी मान्य केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘ऐक शेतकरी राजा रं... जीव लाखमोलाचा हाय रं..! appeared first on पुढारी.