नाशिक : ऐन पावसाळ्यात ‘गंगापूर’मध्ये 9 टक्के तूट, धरणात केवळ ‘इतका’ साठा

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जुलै महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के पाण्याची तूट आहे. धरणात केवळ 27 टक्के साठा आहे. जिल्ह्यातील इतर धरणांतील परिस्थिती जवळपास यासारखीच आहे. त्यामुळे पावसाचा लहरीपणा बघता, येत्या काळात जिल्ह्यापुढे पाणीकपातीचे संकट उभे ठाकले आहे.

राज्यात मान्सूनने जोरदार बॅटिंग केली असताना, नाशिक जिल्ह्यात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम म्हणजे प्रमुख 24 धरणांमधील साठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या या धरणांमध्ये 15 हजार 399 दलघफू (23 टक्के) उपयुक्त साठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत धरणांमध्ये 27 टक्के म्हणजे 17 हजार 959 दलघफू साठा होता. म्हणजेच 2021 च्या तुलनेत यंदा जिल्ह्यात 4 टक्के कमी पाणीसाठा आहे.

गेल्यावेळी गंगापूर समूहातील चारही प्रकल्प मिळून 2,634 दलघफू पाणी होते. सध्या ते 2,242 दलघफू (22 टक्के) इतके आहे. दारणा समूहात 4,005 दलघफू (21 टक्के) साठा आहे. याशिवाय पालखेड समूहात 1,006 दलघफू (12 टक्के), ओझरखेडमध्ये 626 दलघफू
(20 टक्के), तर चणकापूर समूहात 7,036 दलघफू (21 टक्के) पाणी आहे. पावसाचा लहरीपणा आणि धरणांमधील उपलब्ध साठ्यावर नजर टाकल्यास ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावणार आहे.

धरणसाठा (दलघफू)…
गंगापूर 1,497, दारणा 1,076, कश्यपी 298, गौतमी गोदावरी 432, आळंदी 15, पालखेड 281, करंजवण 613, वाघाड 112, ओझरखेड 560, पुणेगाव 66, तिसगाव 00, भावली 205, मुकणे 2,184, वालदेवी 112, कडवा 218, नांदूरमध्यमेश्वर 210, भोजापूर 20, चणकापूर 479, हरणबारी 317, केळझर 33, नागासाक्या 15, गिरणा 6,192, पुनद 276.

हेही वाचा :

The post नाशिक : ऐन पावसाळ्यात ‘गंगापूर’मध्ये 9 टक्के तूट, धरणात केवळ 'इतका' साठा appeared first on पुढारी.