Site icon

नाशिक : ऑनलाइनचा ‘प्रिंटिंग प्रेस’वर परिणाम

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा
काळ बदलला तसे लग्नाचे आमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे सुरू झाले असून, ते अधिक सोयीस्कर असल्याने त्यास प्राधान्य दिले जात आहे. यामुळेच आता ई-वेडिंग कार्डचा वापर करून फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे निमंत्रणे देण्यात येत आहेत. मात्र, यामुळे प्रिंटिंग प्रेस व्यवसायावर परिणाम होताना दिसत आहे.

उन्हाळ्यात केवळ लग्नसराईतील निमंत्रण पत्रिका छापण्याच्या माध्यमातून लाखोंची कमाई व्हायची, आता मात्र लग्नपत्रिका छापण्याऐवजी केवळ पत्रिकेची डिझाइन तयार करून घेण्याचा प्रकार वाढला आहे. कोरोना निर्बंधांपासून घरोघरी पत्रिका वाटण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे लग्नाचे आमंत्रण सोशल मीडियाद्वारे देण्याचा कल आहे. सध्या इंटरनेटचे युग असून, यामुळे नागरिकांचे ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. पूर्वी दुकानदारांसाठी लागणारी बिल बुक, खाते बुक व इतरही साहित्य प्रिंटिंगवाल्यांकडून घेतले जात होते. मात्र, बहुतेक व्यापारी हे संगणकावर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दैनंदिन व्यवहार पूर्ण करत आहेत. पूर्वी उन्हाळ्यात लग्नसराईत लाखो रुपयांची कमाई नुसत्या पत्रिका छपाईतून व्हायची. मात्र, आता तसे होत नसल्याने या व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.

प्रिंटिंग साहित्याच्या दरात वाढ
वेगवेगळ्या प्रिंटिंगसाठी लागणाऱ्या कागदाच्या दरामध्ये वाढ झाली असून, प्रिंटिंगसाठी लागणाऱ्या शाईच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. वन फोम कागदाचा रिम १६० वरून २६० रुपये झाला आहे. प्रिंटिंग व्यवसायात लागणारे कागद, शाई व साहित्य महागले आहे. मात्र, छपाईची मागणी कमी झाली आहे.

ऑनलाइन व्यवहार, सोशल मीडियामुळे प्रिंटिंग व्यवसाय मर्यादित झाला आहे. मागील पाच वर्षांपासून छपाईवर परिणाम झाला आहे. लग्नपत्रिका आता मोबाइलवर, सोशल मीडियाद्वारे टाकल्या जातात व हे निमंत्रण संबंधितांना मान्य असल्याने वेळ व पैसा दोन्ही वाचतो. – उमेश सोनवणे, प्रिंटर्स व्यावसायिक.

हेही वाचा:

The post नाशिक : ऑनलाइनचा 'प्रिंटिंग प्रेस'वर परिणाम appeared first on पुढारी.

Exit mobile version