नाशिक : ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत तीन कोटींचा अपहार

सिध्दीविनायक पतसंस्था ओझरwww.pudhari.news

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा

येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संस्थेचे लेखापाल दिनेश शौचे यांनी संस्थेच्या खात्यातून या रकमेचा अपहार केल्याचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, सिद्धिविनायक पतसंस्थेमार्फतही पत्रव्यवहार पोलिस ठाण्यात केला असून, या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने लेखापरीक्षण करण्यात येत असून, त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल, असे संस्थेमार्फत सांगण्यात आले आहे. ओझर येथील सिद्धिविनायक पतसंस्था नावाजलेली असून, या संस्थेची उलाढाल ७० ते ८० कोटी रुपयांच्या आसपास आहे. अतिशय पारदर्शक कारभार करणारी संस्था, अशी या पतसंस्थेची ख्याती आहे. परंतु या प्रकरणामुळे संस्थेच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. सिद्धिविनायक पतसंस्थेत अपहार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संस्थेचे सभासद सदानंद कदम यांनी या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून, या अपहाराबाबत संस्थाचालकांवरही संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. दिनेश बापूराव शौचे हा लिपिक संस्थेच्या खात्यातून गेल्या नऊ महिन्यांपासून रकमा काढत असतानाही संस्थाचालकांना कुठलाही सुगावा लागला नाही, असे होऊ शकत नाही, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे. संस्थाचालक याबाबत अनभिज्ञ कसे असू शकतात, असा सवालही उपस्थित केला आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे असून, सर्वसामान्यांचा पैसा वाचविण्यासाठी गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आलेली आहे.

हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे निफाड तालुका उपनिबंधकांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. – सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक.

“पतसंस्थेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. सहायक निबंधकांशी पत्रव्यवहार केला असून, त्यांच्यामार्फत लेखापरीक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल”. – अशोक रहाटे, पोलिस निरीक्षक, ओझर.

ठेवीदारांनी घाबरू नये, संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम

पतसंस्थेच्या वतीने या प्रकारानंतर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यात म्हटले आहे की, या प्रकारामुळे पतसंस्थेच्या कोणत्याही ग्राहकांनी अथवा ठेवीदारांनी घाबरण्याचे कारण नाही. संस्थेची आजची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असून, संबंधित कर्मचार्‍याने केलेल्या अपहारामुळे संस्थेच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारांवर व दायित्वावर त्याचा परिणाम होणार नाही, याची ग्राहक व ठेवीदारांनी नोंद घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे ठेवीदारांना करण्यात आले आहे.

पोलिस ठाण्यात शौचे विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या सर्व प्रकणात शौचे यांच्याव्यतिरिक्त इतर पदाधिकारी, संचालक किंवा अन्य कर्मचारी कोणीही सामील नसून संस्थेचे लेखापरीक्षण सुरू असून, याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली जाईल. शहानिशा न करता कोणीही संस्थेची किंवा संचालकांची बदनामी करू नये. – प्रशांत शेळके, मानद सचिव, सिद्धिविनायक पतसंस्था, ओझर.

हेही वाचा:

The post नाशिक : ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत तीन कोटींचा अपहार appeared first on पुढारी.