नाशिक : ओठावर बहिष्कारास्त्र, मनात निवडणुकीचे मांडे

पिंपळगाव बसवंत www.pudhari.news

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : हेमंत थेटे
पिंपळगाव बसवंत शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेऊन शासन दरबारी 10-12 वर्षांपूर्वीच सर्व पूर्तता करून दाखल करण्यात आलेला नगर परिषदेचा प्रस्ताव धूळ खात पडलेला आहे. पिंपळगाव शहराला नगर परिषदेचा दर्जा मिळावा म्हणून गेल्या एक वर्षापासून शहरातील काही ज्येष्ठ नेते, युवानेते कार्यरत आहेत. परंतु महिनाभरात पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहणार आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय दोनदा सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. तीन दिवसांपूर्वीच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. कुणीही उमेदवारी अर्ज दाखल करू नये, याची खबरदारी म्हणून समितीही स्थापन करण्यात आली. परंतु, दोन-तीन दिवसांपासून पिंपळगावातील घडामोडी बघता प्रमुख नेत्यांच्या ओठात एक व पोटात वेगळेच असल्याचे स्पष्ट होत आहे. सावध पवित्रा म्हणून शहरातील प्रमुख नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. तर सामान्य कार्यकर्ते, दुय्यम नेते यांचा कानोसा घेतला असता ठरावीक नेत्यांनी घेतलेला निर्णय सर्व शहराला कसा लागू करता येईल, बहिष्काराच्या नावाखाली लोकशाहीचा खून होत असेल तर ते चुकीचे आहे, नगर परिषद होईल तेव्हा होईल, होऊन जाऊ द्या ग्रामपंचायतीची निवडणूक, आम्ही निवडणूक लढविणारच असा सूर कानी पडत आहे. त्यामुळे नागरिक जरी संभ्रमावस्थेत असतील तरीही बहिष्कारास्त्र फुसका बार ठरणार आणि ग्रामपंचायतीची निवडणूक हमखास होणार हे आता निश्चित मानले जात आहे. आमदार दिलीप बनकर यांच्या गटातील दुसर्‍या फळीतील नेते, कार्यकर्ते उघडपणे ग्रामपंचायत निवडणूक झालीच पाहिजे. आम्ही अर्ज दाखल करणार, अशी भूमिका मांडत आहेत. याशिवाय शहरातील अनेक नेते, कार्यकर्ते यांनीही लोकशाही मार्गाने होत असलेल्या निवडणुकीला पाठिंबा, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी दोन दिवसांत निवडणूक चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी निवडणूक की बहिष्कार यासंदर्भात कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी बुधवारी (दि. 16) सायं. 4 ला फार्महाउसवर बैठक बोलावली आहे. कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकल्यानंतरच ते आपल्या गटाचा निर्णय जाहीर करणार आहेत.

नेते काय म्हणतात…

पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी सायं. 4 वाजता फार्महाउसवर बैठक बोलावली आहे. गटातील नेते, कार्यकर्ते यांचे मनोगत जाणूनच निर्णय घेण्यात येईल. निर्णय लादला जाणार नाही. त्यांच्या मनोगताचा सन्मान राखत लोकशाही पद्धतीनेच निर्णय होईल. – भास्करराव बनकर, माजी सरपंच, पिंपळगाव बसवंत.

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार कोणी कसा टाकला, हे माहीत नाही. पण, लोकशाहीचा गळा घोटून कुणी हुकूमशाहीचा वापर करणार असेल तर सामान्य जनता हुकूमशाही सहन करणार नाही. आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून लोकशाहीचा सन्मान करणार आहे. सामान्य जनतेनेही आमच्या भूमिकेला पाठबळ द्यावे. – बापूसाहेब कडाळे, उपसरपंच, पिंपळगाव बसवंत.

नगर परिषदेचा प्रस्ताव गेल्या एक तपापासून शासन दरबारी धूळ खात आहे. त्यामुळेच नगर परिषद होईल तेव्हा होईल, मात्र निवडणुकीवर बहिष्कार टाकून सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करून त्यांचा उत्साह कमी करू नका. कार्यकर्ते साथ सोडून पळतील, असे निर्णय घेऊ नका. – उमेश बनकर, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पिंपळगाव.

निवडणुकीवर बहिष्कार म्हणजे लोकशाहीचा खूनच आहे. ठरावीक नेत्यांचा निर्णय म्हणजे संपूर्ण शहराचा निर्णय होऊ शकत नाही. ग्रामपंचायतीसारख्या निवडणुका छोट्या कार्यकर्त्यांसाठी असतात. त्यामुळे नेत्यांनी कार्यकर्त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार देऊ नये. यातून राजकीय भूकंप होऊ शकतो. – सोमनाथ मोरे, संचालक, निफाड एज्युकेशन सोसायटी.

हेही वाचा:

The post नाशिक : ओठावर बहिष्कारास्त्र, मनात निवडणुकीचे मांडे appeared first on पुढारी.