नाशिक : कंपनीने जलवाहिनी फोडली म्हणून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या सहा महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या कंपनीने शेताला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फोडल्यामुळे शेतकर्‍याला बागायती पिके घेता आली नाहीत. परिणामी, या शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ आली होती. संबंधित कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करूनही दखल न घेतल्याने अखेर शेतकर्‍याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित शेतकर्‍याची प्रकृती चिंताजनक असून, नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कंपनीने नुकसानभरपाई न दिल्यामुळेच निवृत्ती भोसले या शेतकर्‍याने विष प्राशन केले, असा आरोप पीडित शेतकर्‍याची पत्नी संगीता भोसले व मुलगा गणेश भोसले यांनी केला आहे. संबंधित शेतकर्‍याला तातडीने नुकसानभरपाई द्यावी अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा धामणीचे सरपंच गौतम भोसले यांनी दिला आहे. धामणी येथे निवृत्ती पुंजा भोसले (49) यांची साडेचार एकर बागायती जमीन आहे. या ठिकाणी जीव्हीपीआर कंपनी समृद्धी

महामार्गाचे काम करत आहे. ठेकेदाराने 900 फूट जलवाहिनी फोडल्यामुळे भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. कंपनीने त्वरित पाइपलाइन जोडून द्यावी, अशी मागणी कंपनी व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र, कंपनीने या मागणीकडे दुर्लक्ष केले. भोसले यांनी कर्ज काढून पुन्हा पाइपलाइन दुरुस्त केली होती. या कंपनीने पुन्हा पाइपलाइन फोडल्यामुळे सहा महिन्यांपासून शेतात कोणतेही उत्पन्न घेता आले नाही. अखेर भोसले या शेतकर्‍याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. या घटनेमुळे धामणी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

घरांना तडे; नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित
गेल्या दोन वर्षांपूर्वी महामार्गाच्या कामासाठी जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट घडवल्याने या परिसरातील अनेक नवीन बंगले व घरांना तडे गेले होते. तडे गेलेल्या घरांचा पंचनामा करून नुकसानभरपाई देऊ, असे आश्वासन या कंपनीने दिले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही नुकसानभरपाई मिळाली नसल्याची संबंधितांची तक्रार आहे. काम बंद पाडण्याचा इशारा धामणीचे सरपंच गौतम भोसले यांनी दिला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कंपनीने जलवाहिनी फोडली म्हणून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न appeared first on पुढारी.