नाशिक : कचरा वर्गीकरणाकडे काणाडोळा; कठोर कारवाईचा इशारा

घनकचरा व्यवस्थापन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या घंटागाडीवर लावण्यात आलेल्या ‘जिंगल’मधून ओला आणि सुका कचर्‍याचे वर्गीकरण करण्याबाबतचे सातत्याने आवाहन केले जाते. मात्र, अशातही बहुतांश रहिवासी वर्गीकरण न करताच घंटागाडीमध्ये एकत्रित कचरा देत असल्याने, 342 रहिवाशांना महापालिकेच्या घनकचरा संकलन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी तब्बल एक लाख 72 हजारांचा दंडही वसूल केला आहे. सर्वाधिक कारवाई पंचवटी विभागात करण्यात आली आहे. यापुढे ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असून, दंडाची रक्कमदेखील वाढवली जाणार आहे.

महापालिकेने मागील 1 डिसेंबरला वॉटरग्रेस कंपनीला साडेतीनशे कोटींना घंटागाडी ठेका दिला. शहरात जुन्या व नव्या अशा चारशेहून अधिक घंटागाड्या धावत असून, कचरा संकलन केले जात आहे. छोट्या घंटागाड्यांद्वारे अगदी गल्लीबोळातील कचरादेखील उचलला जात आहे. घंटागाडीत ओला व सुका कचरा संकलनासाठी विलगीकरणाची व्यवस्था आहे. संकलित कचरा विल्होळी येथील खतप्रकल्पावर विल्हेवाट लावण्यासाठी नेला जातो. शहरात दिवसाला तब्बल सहाशे टन कचरा संकलित होतो. कचरा विलगीकरण नसल्यास घनकचरा संकलन विभागाकडून ठेकेदाराला दंड आकारला जातो. त्याचबरोबर नागरिकांनीदेखील कचरा घंटागाडीत टाकताना त्याचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. घंटागाडी फिरताना तिच्याद्वारे ओला व सुका कचरा एकत्र करू नये, अशी जनजागृती केली जाते. तरीही नागरिकांकडून त्यास प्रतिसाद लाभत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिकेने वेळोवेळी सवलत देऊनही परिणाम होत नसल्याने ओला व सुका कचरा विलगीकरण न केल्याप्रकरणी स्वच्छता निरीक्षकांनी रहिवासी इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील सहाही विभाग मिळून 342 रहिवासी इमारतींना ओला व सुका कचरा वर्गीकरण न केल्याचे आढळल्याने नोटिसा देण्यात आल्या. त्यांच्याकडून पावणेदोन लाख दंड वसूल करण्यात आला आहे. पहिली नोटीस असल्याने एका इमारतीकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात आला. तसेच एक व्यावसायिकालादेखील पाच हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे.

नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे आवश्यक आहे. जे रहिवासी कचरा वर्गीकरण करत नसतील, अशा इमारतींना नोटिसा बजावत दंड वसूल केला आहे. नागरिकांनी कारवाई टाळत सहकार्य करावे. – डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा संकलन व व्यवस्थापन विभाग.

हेही वाचा:

The post नाशिक : कचरा वर्गीकरणाकडे काणाडोळा; कठोर कारवाईचा इशारा appeared first on पुढारी.