नाशिक : करवसुलीकरिता मनपाच्या गळ्यात पुन्हा “ढोल’

ढोल बजाओ मोहीम,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेने गेल्या वर्षी ढोल बजाओ मोहीम हाती घेत थकबाकीदारांकडून १० कोटींची घरपट्टी वसूल केली होती. अर्थात, या योजनेला नंतर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, आर्थिक वर्ष संपण्याच्या आत उद्दिष्ट गाठण्यासाठी मनपाने पुन्हा एकदा ढोल गळ्यात अडकवून थकबाकीदारांकडून थकीत कर वसूल करण्यासाठी तयारी केली आहे.

यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विविध कर आकारणी विभागाला तशा स्वरूपाचे निर्देश दिले असून, ५० हजारांवरील थकबाकीदारांच्या घर, इमारत तसेच कार्यालयासमोर ढोल वाजविण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे दोन ते अडीच वर्षे महापालिकेच्या तिजोरीत पाहिजे तेवढा कर जमा होऊ शकला नाही. करवसुली ठप्पच झाली होती. घरपट्टी, पाणीपट्टीपोटी आजमितीस चारशे कोटींहून अधिक थकीत रक्कम झाली आहे. यामुळे ही थकीत रक्कम वसूल करण्याकरता मनपा प्रशासनाकडून क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. महापालिकेने सुरुवातीला अभय योजना आणि नियमित करदात्यांसाठी सवलत योजना आणली. मात्र, फारशी थकबाकी वसूल होऊ शकली नाही. त्यामुळेच गेल्या वर्षी १७ ऑक्टोबरपासून थकबाकीदारांच्या घरासमोर तसेच कार्यालयासमोर ढोल बजाओ मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या चार दिवसांत सुमारे चार कोटींची थकबाकी वसूल झाली. दिवाळीच्या काळात ही मोहीम थांबविण्यात आली. दिवाळीनंतर मोहीम सुरू झाली. मात्र १५ दिवसांत सहा कोटींचा थकीत कर तिजोरीत जमा झाला. मात्र, सुरुवातीला मिळालेला प्रतिसाद कायम न राहिल्याने मनपाने ही मोहीम स्थगित केली. यादरम्यान महापालिकेने बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्याची कार्यवाही सुरू केली असून, पुन्हा एकदा ढोल बजाओ मोहीमही राबविली जाणार आहे.

जप्ती वॉरंट बजावण्याचे आदेश

घरपट्टी वसुलीकरता मनपाकडून ढोल बजाओ मोहीम राबविली जाणार आहे, तर दुसरीकडे एक लाख व त्यापुढील कर थकविलेल्या बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्याचे निर्देश उपआयुक्त (कर) अर्चना तांबे यांनी दिले आहेत. जप्ती वॉरंटनंतरही दिलेल्या २१ दिवसांच्या मुदतीत कर जमा न करणाऱ्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक : करवसुलीकरिता मनपाच्या गळ्यात पुन्हा "ढोल' appeared first on पुढारी.