नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे पुन्हा ढोल बजावो, पहिल्या दिवशी ‘इतकी’ वसूली

ढोल बजाओ मोहीम,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मार्चअखेरपर्यंत महसूल वाढविण्याच्या दृष्टीने मनपाच्या विविध कर आकारणी विभागाने कर थकबाकी असणाऱ्या मिळकतधारकांविरोधात पुन्हा एकदा आपली ढोल बजाओ मोहीम हाती घेतली असून, गुरुवारी (दि. ९) पहिल्या दिवशी १६ लाख ८८ हजारपैकी १३ लाख नऊ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीकरिता कर आकारणी विभागाला ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कर विभागाच्या उपआयुक्त अर्चना तांबे यांनी थकबाकीदारांना नोटीस देणे, मालमत्ता जप्ती वॉरंट बजावणे आणि थकीत मालमत्तांचा लिलाव अशा स्वरूपाच्या कारवाया सुरू केल्या आहेत. तसेच घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी असणाऱ्या कार्यालये, मालमत्ताधारकांच्या घरासमोर आणि दुकानांसमोर जाऊन ढोल वाजविण्याची माेहीमही कर विभागाने हाती घेतली आहे.

मागील वर्षी दिवाळीपूर्वी या मोहिमेला सुरुवात झाली हाेती. दिवाळीमुळे मोहीम थांबविली होती. मात्र आता मार्चअखेर जवळ आल्याने उत्पन्नवाढीसाठी तसेच थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी मनपाने पुन्हा एकदा ढोल बजावो मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी (दि. ९) मनपाच्या सहाही विभागांत ही मोहीम राबविली. सहा विभागांतील १४५ मालमत्तांकडे १६ लाख ८८ हजार ३६६ रुपये थकीत होते. त्यापैकी १३ लाख नऊ हजार १८१ रुपयांची वसुली केली आहे.

६६१ नळ कनेक्शन बंद

घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टीचीही मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने मनपाच्या कर विभागाने थकबाकी असणाऱ्या मालमत्तांचे नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार १ जानेवारी ते ९ मार्च २०२३ या कालावधीत कर विभागाच्या पथकांनी थकबाकी असणाऱ्या ७,८५५ नळ कनेक्शनला भेटी दिल्या. त्यापैकी ६६१ नळ कनेक्शन बंद केले असून, १० कोटी थकबाकीपैकी आठ कोटी ४७ लाख १७ हजार रुपये मनपा तिजोरीत जमा झाले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे पुन्हा ढोल बजावो, पहिल्या दिवशी 'इतकी' वसूली appeared first on पुढारी.