नाशिक : कांदा परिषद होऊन आठ महिने….मंत्र्यांना केंव्हा पाजणार कादा ज्यूस……सदाभाऊंना अल्टीमेटमचा पडला विसर

नाशिकमध्ये कांदा परिषद,www.pudhari.news
नाशिक (लासलगाव) :  राकेश बोरा
कांदा दर घसरणीबाबत राज्यातील भाजप-शिंदे सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने सरकार आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष सत्तेच्या साठमारीत मशगुल आहेत. कोणत्या पक्षाला कोणते चिन्ह मिळाले, कोणाचे आमदार अपात्र झाले, कोणाचे सरकार टिकणार यातच सत्ताधारी पक्षांनी महाराष्ट्राला गुंतवून टाकले आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे तर रुई गावात जून-२०२२ मध्ये सदाभाऊ खोत यांनी कांदा परिषद घेऊन त्यावेळेसच्या सरकारला कांदाअनुदान न दिल्यास ज्युस पाजू असा इशारा दिला होता, याचा मात्र खोत यांना विसर पडल्याचं दिसत आहे.
“जागर शेतकऱ्यांचा आक्रोश कांदा उत्पादकांचा” म्हणत दिनांक ५ जून २०२२ वार रविवारी संपूर्ण राज्याचे लक्ष लागले ते निफाड तालुक्यातील रुई गावात होणाऱ्या कांदा परिषदकडे. तब्बल ३९ वर्षानंतर झालेल्या या परिषदेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला ५ रुपये किलो अनुदान मिळावे याकरिता माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार ला चांगलेच धारेवर धरत कांदा दराबाबत एक आठवड्याची मुदत देत आहोत. त्यानंतर मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर लासलगाव येथे कांद्याला हमीभाव व अनुदान साठी प्रहार जनशक्तीने केलेले आंदोलन तसेच येवला येथील कांदा उत्पादन आणि व्यापार यासाठी झालेले आंदोलन. या आंदोलनाची चर्चा  राज्यात जोरात झाले. मात्र अद्याप पर्यंत कांद्याला अनुदान मिळावे म्हणून असे कुठलीही ठोस पावली उचलताना दिसत नसल्याने शेतकरी हतबल झालेला आहे.तर राज्य सरकारने कांद्याला अनुदान न दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करून मंत्र्यांना कांदा ज्यूस पाजू असा इशारा देणारे सदाभाऊ मंत्र्यांना केंव्हा ज्यूस पाजनार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
याच कांदा परिषदमध्ये गोपीचंद पडळकर यांनी महाविचे सरकार बहिरे, आंधळे अन मुके असे सरकार असल्याचे संबोधले होते तर प्रवीण दरेकर यांनी या कांदा परिषदेत बोलताना  ४० वर्ष उलटूनही कांद्याचे प्रश्न कायम आहे याची खंत आहे. रडीचा डाव …राज्य सरकार खेळत आहे…या सर्व नेते आता गप्प का? असा सवाल शेतकऱ्यांना कडून उपस्थित केला जात आहे. व्यासपीठावरून मोठमोठी लांबलचक भाषणे करताना आपल्याला शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, बळीराजा अशा अनेक प्रकारच्या उपमा देवून त्यांची भलावण करतात; परंतू प्रत्येक्षात मदत करण्याची वेळ आल्यावर हजार कारणे सांगितले जातात.

हेही वाचा:

The post नाशिक : कांदा परिषद होऊन आठ महिने....मंत्र्यांना केंव्हा पाजणार कादा ज्यूस......सदाभाऊंना अल्टीमेटमचा पडला विसर appeared first on पुढारी.