नाशिक : कांदा पेटला; नाफेडची खरेदी संशयाच्या भोवर्‍यात

कांदा ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कांदा दराबाबत सरकारच्या धरसोड धोरणामुळे कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. सरकारने यापुढे आवश्यक वस्तू कायदा अथवा विदेश व्यापार कायद्यांतर्गत कांदा व्यापारात हस्तक्षेप करू नये, या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून 9 ऑगस्ट या क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरासमोर लाक्षणिक रात्र-धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवसापासून शेतकरी संघटनेच्या कांदा बाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह आंदोलनास सुरुवात केली जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाफेडच्या कांदा खरेदीबाबतही संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत शेतकर्‍यांच्या नावाची यादी मागितली आहे.

ललित बहाळे म्हणाले की, कांदा खालच्या किमतीच्या पातळीवर खरेदी करून साठवण केलेला कांदा बोस्टन टी पार्टीप्रमाणे नष्ट करावा किंवा कांदा साठवणुकीचा खर्च वजा करून या साठवलेल्या कांदा विक्रीनंतरचा नफा शेतकर्‍यांमध्ये वाटून द्यावा, अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे सरकारने कांदा व्यापारात हस्तक्षेप न करता, जागतिक व्यापार संघटनेच्या नियमाप्रमाणे कांदा व्यापार सुरू राहू द्यावा, अशी आमची मागणी आहे. सरकारकडे यापेक्षा चांगला प्रस्ताव असल्यास त्यांच्यासोबत चर्चा करण्याची आमची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. धरणे आंदोलन दिवसा केल्यास त्याचा त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना होतो, म्हणून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरासमोर रात्र धरणे आंदोलन केले जाणार असल्याचा खुलासा करतानाच, आम्ही सरकारचे निर्बंध झुगारून हे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी उत्पादक कंपन्या नव्हे, व्यापार्‍यांकडून खरेदी

नाफेडकडून शेतकर्‍यांच्या समूहांकडून कांदा खरेदी करून त्याची साठवणूक केली जाते. मात्र, या कांदा खरेदी करणार्‍या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नावाखाली, त्यात व्यापार्‍यांनी शिरकाव केल्याचा आरोप शेतकरी संघटनेकडून करण्यात आला. नाफेडने कोणत्या शेतकर्‍यांकडून किती कांदा खरेदी केला व कोणत्या दराने खरेदी केला, याची चौकशी सरकारने करावी, अशी आमची मागणी असून, याबाबत सरकारशी पत्रव्यवहार केल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

हेही वाचा :

The post नाशिक : कांदा पेटला; नाफेडची खरेदी संशयाच्या भोवर्‍यात appeared first on पुढारी.