नाशिक : कांदा-भाकरी खात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांचा ठिय्या

कांदा भाकर खात आंदोलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घसरलेल्या कांद्याच्या दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी साेमवारी (दि. २७) निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. कांद्याला हमीभाव मिळेपर्यंत ठिय्या देण्याचा इशारा देत आंदोलकांनी दालनात कांदा-भाकरी खात शासनाचा निषेध केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला क्विंटलला अवघा ५०० रुपये दर मिळाला. उत्पादन खर्चही निघत नसताना केंद्र व राज्य शासनाने कांद्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सोबत आणलेली कांदा, भाकरी आणि मिरच्यांचा ठेचा खाल्ला. यावेळी त्यांनी डोईफोेडे यांनाही जेवणाची विनंती केली होती. मात्र, त्यांनी नम्रपणे नकार दिला.

कांद्याच्या दराबाबत शासनाने डोळेझाक केल्यामुळे आंदोलन करावे लागत आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तसेच अधिवेशनात याप्रश्नी कोणताही ठोस निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला. रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवनाथ जाधव, विशाल पवार, निवृत्ती कुवर, वाल्मीक सांगळे यांच्यासह धुळे व नंदुरबार येथील संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

या आहेत प्रमुख मागण्या

– कांद्याला १५०० रुपये दर निश्चित करावा.

– बाजार समितीत १५०० रुपयांच्या खाली विक्री झालेल्या कांद्याची उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करावी.

– मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात भावांतर योजना सुरू करावी.

– नाफेडद्वारे मार्चमध्ये कांदा खरेदी सुरू करताना प्रतिकिलो ३० रुपये भाव द्यावा.

– जिल्हा बँकेतील मोठ्या थकबाकीदारांची वसुली आधी करावी.

– सरकारने १० एकरच्या आतील कर्ज थकीत खातेदाराचे व्याज स्वनिधीतून द्यावे.

पालकमंत्र्यांशी चर्चा; आंदोलनाचा इशारा

आंदोलनाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी फोनवरून पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी आंदोलकांची चर्चा करून दिली. ना. भुसे यांनी दोन दिवसांत याप्रश्नी संघटनेच्या ५ जणांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तीन दिवसांत मागण्यांकडे लक्ष न दिल्यास चौथ्या दिवशी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दीपक पगार यांनी पालकमंत्र्यांशी बाेलताना दिला.

हेही वाचा : 

The post नाशिक : कांदा-भाकरी खात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांचा ठिय्या appeared first on पुढारी.